रत्नागिरी : गोळप येथे दोघा नेपाळी भावांची हत्या | पुढारी

रत्नागिरी : गोळप येथे दोघा नेपाळी भावांची हत्या

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोळप गावी पावस बायपास रोडलगत असणार्‍या आंबा बागेत रखवालदार म्हणून काम करणार्‍या दोन नेपाळी सख्ख्या भावांचा डोक्यात वार करून आणि दगड घालून सोमवारी रात्री खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी आंबे काढण्यासाठी कामगार बागेत गेले असताना हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, आंबे चोरीसाठी आलेल्या व्यक्तींनी या दोघांना मारले की, पूर्ववैमनस्यामधून अन्य नेपाळी कामगारांनी मारले? याचा पोलिस शोध घेत आहेत. रत्नागिरी तालुक्यात तीन दिवसांच्या फरकाने झालेल्या खुनाच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

रत्नागिरी-पावस बायपास मार्गावर गोळप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुस्लीम मोहल्ला येथे मुदस्सर मुकादम यांची आंबा कलमांची बाग आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भक्त बहाद्दूर थापा (वय 60), ललन बहाद्दूर थापा (वय 55) (मूळ रा. नेपाळ, सध्या आंबा बाग, गोळप) येथे रखवालदार म्हणून कामाला होते. बागेच्या सड्यावर आंब्याच्या झाडाच्या बुंध्यावर मचान करून ते रहात होते. यातील एक भाऊ मुकादम यांच्या जवळच्याच बागेत रखवालदारी करीत होता. त्या बागेतील आंबे काढण्याचे काम पूर्ण झाल्याने तो भावासोबत राहण्यासाठी तीन-चार दिवसांपूर्वीच या ठिकाणी आला होता. त्या नंतर हे दोघेही सख्खे भाऊ तेथेच रहात होते.

मंगळवारी सकाळी मुदस्सर मुकादम यांचा एक कामगार बागेत आला असता त्याला दोघे थापा बंधू मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. त्याने याबाबतची माहिती मालकांना दिली. त्या नंतर मुदस्सर मुकादम आंबा बागेत दाखल झाले. यावेळी भक्त, ललन थापा हे दोघेही रक्ताच्या थारोळयात आंबा झाडाच्या बुंध्याखाली मृतावस्थेत पडलेले होते. त्यानंतर मुकादम यांनी या घटनेची माहिती पूर्णगड पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पूर्णगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धायकर यांच्यासह श्वानपथक, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून भक्त बहाद्दूर थापा, ललन बहाद्दूर थापा या दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले.

एकाच वेळी दोघांची हत्या झाल्याने या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर स्थानिक गुन्हे शाखा स्वतंत्रपणे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

नेपाळी तरुणांकडे चौकशी…

या हत्येच्या संशयावरून पोलिसांनी परिसरातील आंबा बागांमध्ये काम करणार्‍या नेपाळी तरूणांना पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी आंबा बागेत काही चोरांनी आंबा चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दोघा थापा बंधूंनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्याकडील आंबा काढण्याचा घळ हिसकावून घेतला होता व तो दुसर्‍या दिवशी मालक मुदस्सर यांच्याकडे जमा केला होता. त्यामुळे दोघा थापा बंधूंची हत्या आंबा चोरीच्या प्रकरणातून झाली की नेपाळमधील पूर्ववैमनस्यातून थापा बंधूंचा काटा काढण्यात आला, हे शोधण्याचे आव्हान जिल्हा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

ना संशयास्पद वस्तू ना श्वानांकडून माग… पोलिसांना आव्हानच…

घटनास्थळाचा परिसर पोलिसांनी तपासला असून पोलिसांना परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. तर श्वान पथकही हत्या करणार्‍यांचा माग काढण्यासाठी आंबा बागेच्या बाहेर गेलेले नाहीत. परिसरातच श्वान घुटमळत राहिल्याने हल्लेखोर नेमके कोणत्या दिशेने पळून गेले याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. तर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील रक्त, मातीचे नमुने ताब्यात घेतले आहेत.

घटनास्थळी रक्ताने माखलेले दगड…

भक्त थापा, ललन थापा हे गेले सहा महिने मुदस्सर मुकादम यांच्या आंबा बागेत रखवालदार म्हणून काम करत होते. सोमवारी मध्यरात्री अज्ञाताने धारदार हत्याराने दोघांवर सपासप वार करून त्यांच्या डोक्यात दगड घालून मृतदेहाचा चेहरा छिन्नविच्छिन्न केला होता. घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेले दोन दगड आढळून आले. परंतु, वार करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार घटनास्थळी आढळून आलेले नाही.

Back to top button