Loksabha Election | पुण्यातून 35 तर शिरूरमधून 32 उमेदवार निवडणूक रिंगणात.. | पुढारी

Loksabha Election | पुण्यातून 35 तर शिरूरमधून 32 उमेदवार निवडणूक रिंगणात..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोमवारी (दि. 29) संपली. पुण्यातून सात, तर शिरूरमधून तीन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे पुण्यातून 35 आणि शिरूरमधून 32 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. याबरोबरच दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. पुणे आणि शिरूर मतदारसंघांमधून 18 ते 25 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या कालावधीत पुण्यातून 42, तर शिरूरमधून 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 26 एप्रिल रोजी या दोन्ही मतदारसंघांतील दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.

त्यामध्ये पुण्यातून एकही उमेदवारी अर्ज बाद झाला नाही, तर शिरूरमधून अपक्ष 11 उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे पुण्यातून 42, तर शिरूरमधून 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत पुण्यातून सात उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये पुण्यातून महायुतीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांनी पर्यायी अर्ज सादर केला होता. मोनिका मोहोळ यांनी सोमवारी माघार घेतली. यासोबत इतर सहा अशा एकूण सात जणांनी माघार घेतली. शिरूर मतदारसंघातून तीन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे पुण्यातून 35 आणि शिरूरमधून 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.

शिरूरमध्येही अपक्ष उमेदवाराला ’ट्रम्पेट’ चिन्ह

पुणे आणि शिरूर मतदारसंघांमधील उमेदवारांना चिन्हांचे वाटप सोमवारी करण्यात आले. त्यामध्ये शिरूरमधील एका अपक्ष उमेदवाराला ”ट्रम्पेट’ हे चिन्ह देण्यात आले. मात्र, त्याला कुणीही आक्षेप घेतला नाही. बारामती मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला हे चिन्ह दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतला होता. ’ट्रम्पेट’चे मराठीत भाषांतर ’तुतारी’ करण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, हा आक्षेप फेटाळण्यात आला आहे. मात्र, शिरूरमध्ये उपस्थित उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी ’ट्रम्पेट’ हे चिन्ह अपक्षाला दिल्यानंतर आक्षेप घेतला नसल्याची माहिती शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी स्पष्ट केले.

पुण्यातून माघार घेतलेल्यांची नावे

– मोनिका मुरलीधर मोहोळ
– ललिता सीताराम तंगिरीला
– शशिकांत राऊत
– योगेश राजापूरकर (किसान पार्टी)
– सुरेशकुमार ओसवाल
– माणिक मुंडे
– अकुल सईद अरकाटी

शिरूरमधून माघार घेतलेल्यांची नावे

रूपाली घाडगे
– शिवाजी पवार
– गोविंदसिंह राजपूत

हेही वाचा

Back to top button