नंदुरबारमध्ये ११ उमेदवार रिंगणात; भाजप-कॉंग्रेसमध्ये मुख्य लढत | पुढारी

नंदुरबारमध्ये ११ उमेदवार रिंगणात; भाजप-कॉंग्रेसमध्ये मुख्य लढत

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेले डमी अर्ज माघारी घेतल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याविषयीची माहिती सोमवारी (दि.२९) दिली.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी (दि.२९) शेवटची तारीख होती. या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच मुख्य लढत रंगणार असल्याचे दिसत असले तरी विविध संघटनांच्या वतीने उभे असलेले उमेदवार लढतीमध्ये रंग भरणार का? हे पुढील प्रचाराच्या काळात स्पष्ट होईल. छाननी अंती १६ इच्छुकांचे नामांकन अर्ज वैध ठरले होते. सोमवारी (दि.२९) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी मंत्री अॅड. के सी पाडवी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, हेमलता पाडवी आदींचा समावेश आहे.

सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या ११ उमेदवारांमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार तथा महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा समावेश आहे. डॉ. हिना गावित या सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी यांची मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिंगणात असलेल्या ११ उमेदवारांपैकी ६ उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे तर ५ अपक्ष उमेदवार आहेत.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष, चिन्ह असे

आनंदा सुकलाल कोळी : बहुजन समाज पाटी (हत्ती), अॅड गोवाल कागडा पाडवी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात), डॉ. हिना विजयकुमार गावीत : भारतीय जनता पार्टी (कमळ), श्रीमती निर्मला वसावे : पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) (ऑटो रिक्शा), रविंद्र रणजित वळवी : भारतीय आदिवासी पार्टी (हॉकी आणि बॉल), हेमंत मन्साराम कोळी : वंचित बहुजन आघाडी (प्रेशर कुकर), श्रीमती गितांजली कोळी : अपक्ष (माइक), जालमसिंग सुतुम पवार : अपक्ष (ट्रक), दिपककुमार मधुकर शिरसाठ : अपक्ष (शिट्टी), रोहिदास गेमजी वळवी : अपक्ष (बॅटरी टॉर्च), सुशिलकुमार जहांगीर पावरा : अपक्ष (नागरिक)

हेही वाचा :

Back to top button