शाळेच्या गरजांबाबत करावे लागणार ‘हे’ नियोजन ! | पुढारी

शाळेच्या गरजांबाबत करावे लागणार 'हे' नियोजन !

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुटीत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी शासनाने 71 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये शाळेचा विकास आराखडा तयार करून ठेवावा, कोणत्या भौतिक सुविधा व गुणवत्ता याची पूर्तता करायची आहे, याचे नियोजन शिक्षकांना करावे लागणार आहे. लोकसहभाग, माजी विद्यार्थी, तरुण मंडळी, ग्रामपंचायतीचा 15 वा वित्त आयोग, मनरेगा, स्वयंसेवी संस्था, सीएसआर निधी यांच्या माध्यमातून शाळेच्या कोणत्या गरजा पूर्ण करता येतील, याकडे लक्ष देऊन त्याचे नियोजन शिक्षकांना करायचे आहे.

शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व शाळा परिसर स्वच्छ करून घ्यावा, शाळेच्या पहिल्या दिवशी 100 टक्के मुले उपस्थित राहतील याची काळजी घ्यावी, त्यासाठी पालकांना अगोदर सूचना द्याव्यात, नवागतांचे स्वागताच्या तयारीचे नियोजन करावे, शिक्षकांच्या कामाचे वाटप नियोजन करून करावे, वर्ग वाटप करून घ्यावेत, शालेय व्यवस्थापन कमिटी तसेच पालक मेळावा शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्याचे निर्देश या पत्रात प्रशासनाने जारी केले आहेत.

गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तरुण मंडळी, बचत गट, पालक, लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करावे, शाळेतील वर्ग सजावट, पताका, शालेय दप्तर, फाईल्स पहिल्या आठवड्यातच परिपूर्ण होतील यासाठी विशेष लक्ष देण्याचे यामध्ये खास नमूद आहे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, किचन याबाबत दक्षता घेतली पाहिजे, दानशूर व्यक्तीकडून शालेय साहित्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे.

दिव्यांग, अनाथ आणि निराधार मुलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करावे, फळ्याला रंग देणे, अधिकारी-पदाधिकारी यांची माहिती त्याच्यावर अद्ययावत करणे, गणित पेटी, भाषा पेटी प्रयोगशाळा, ग्रंथालय यातील साहित्यांचा वापर व्यवस्थित करणे, अडगळीचे साहित्य तसेच खराब साहित्य निर्लेखन करून घ्यावे, शाळेत वीज, सौर ऊर्जा, पाणी यासाठी नियोजन करावे, कमी पटांच्या शाळा समूह शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करणे, एकाच कॅम्पसमध्ये भरणार्‍या मुले व मुलींच्या वेगवेगळ्या शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीपासून पदोन्नतीपर्यंतच्या कामांची जबाबदारी

विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी मुलांचे फोटो, पासबुक, आधार, उत्पन्नाचा दाखला याबाबतच्या सूचना पालकांना देणे व पाठपुरावा करणे, ऑनलाइन शिष्यवृत्तीचे कामकाज पूर्ण करावे, वरिष्ठ मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदोन्नती आदी काम सुटी असली तरी कार्यालयात वेळेवर जमा होईल त्याकडे लक्ष देणे, तसेच पदोन्नती, वरिष्ठ वेतन कामासाठी प्रत्येकी 15 ते 20 प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतात, ती सर्व स्कॅन करून त्याची सॉफ्ट कॉपी सुटीत केंद्रप्रमुखांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करावी लागणार आहे.

हेही वाचा

Back to top button