नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : येडगाव धरणातून कुकडी नदीतून शिरूर नगरपरिषदेसाठी पाणी सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने जुन्नर हद्दीतील येडगाव धरण व कुकडी नदीच्या दोन्ही बाजूच्या सुमारे पाच हजार कृषीपंपांचे विजेचे कनेक्शन बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकर्यांचा आक्रमक पवित्रा पाहून जलसंपदा विभागाने कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. तसेच वीज तोडण्यापूर्वी शेतकर्यांना पूर्वकल्पना दिली जाईल, असे जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार अतुल बेनके यांनी मध्यस्थी केल्याने शेतकरी शांत झाले. पाणीप्रश्न संदर्भात शेतकर्यांसोबत असल्याचे खा. अमोल कोल्हे यांनी भ्रमणध्वनीवरून शेतकर्यांना सांगितले. कुकडी प्रकल्पातून शिरूर नगरपरिषदेला पिण्याचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रविवारी (दि. 28) सकाळी येडगाव धरणाच्या व कुकडी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूच्या कृषीपंपांचे विजेचे कनेक्शन तोडण्यात आले. ही माहिती समजताच शेतकरी आक्रमक झाले. महावितरणचे कर्मचारी व जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता आर. जे. हांडे यांना शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणत्याही परिस्थितीत कृषीपंपांचे कनेक्शन तोडू देणार नाही, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली. तथापि, जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांकडून कृषीपंपांचे कनेक्शन तोडले.
यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. त्यांनी अधिकार्यांच्या गाडीची चावी काढून घेतली. कृषीपंपांचे कनेक्शन जोडून दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी पोलिसांना पाचारण केले. येडगाव येथील काही शेतकर्यांनी आ. बेनके यांना ही बाब सांगितली. बेनके यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधून शेतकर्यांना पूर्वसूचना न देता कृषीपंपांचे कनेक्शन तोडू नका, असे सांगितले. तसेच तत्काळ कनेक्शन जोडून देण्यास सांगितले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी सल्लामसलत करून कृषीपंपांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडून दिले. नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणपत डोंगरे यांनी येडगावला येऊन शेतकर्यांना धीर दिला.
हेही वाचा