चवदार जांभळांनी खाल्ला भाव..! | पुढारी

चवदार जांभळांनी खाल्ला भाव..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळा म्हटले, की अनेक प्रकारचा चवदार रानमेवा बाजारात दाखल होत असतो. त्यातीलच एक रानमेवा म्हणजे जांभूळ. गोड-तुरट, जांभळट रंगाची ही जांभळे हंगाम सुरू झाल्याने सध्या शहरातील विविध फळ विक्रेत्यांकडे दिसू लागली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 22 दिवस उशिराने दाखल झालेली जांभळे मात्र ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवत आहे. उत्पादन रोडावल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर गगनाला भिडले आहेत. फळबाजारात एक किलो जांभळाची 400 ते 600 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात गुजरात तसेच स्थानिक भागातून जांभळांची आवक होत आहे. यंदा 20 ते 22 दिवस उशिराने हंगाम सुरू झाला. लहरी हवामानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात एक दिवसाआड जांभळांची आवक सुरू आहे. सध्या बाजारात स्थानिक भागातून 10 ते 12 किलोचे 3 ते 4 डाग तसेच गुजरात येथून 25 ते 30 डागांची आवक होत आहे. गतवर्षी हीच आवक 200 डाग एवढी होती. बाजारात स्थानिक मध्यम स्वरूपाच्या जांभळांना 2 हजार ते 3 हजार रुपये दर मिळत आहे. तर, गुजराती लहान जांभळांना 1 हजार 600 ते 1 हजार 800 रुपये दर मिळत आहे. दर्जेदार जांभळांना 3 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे जांभळांचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

काय आहेत वैशिष्ट्ये?

  • स्थानिक – साल पातळ, टिकवणक्षमता कमी, गुजरातच्या तुलनेत अधिक गोड, या जांभळांना राज्यात मोठी पसंती मिळते.
  • गुजरात- लालसर असतात. साल जाड असते. जाड सालीमुळे टिकवणक्षमता अधिक राहते. गोडीलाही चांगली असतात. या जांभळांना दिल्लीत मोठी पसंती मिळते.
लहरी हवामानामुळे जांभळांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्या 20 ते 30 टक्केच उत्पादन असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे. पुढील महिन्यात जांभळांची आवक वाढून दर खाली येतील. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत ते चढेच राहतील.
– शिवाजी भोसले, अडतदार, मार्केट यार्ड
जांभळांची विक्री दोन दिवस चालते. यंदा जांभळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. बाजारात एक किलो जांभळाची 400 ते 600 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. दर जास्त असल्याने ग्राहकही कमी प्रमाणात खरेदी करीत आहेत.
– गणेश मल्हारी, विक्रेते, लष्कर
हेही वाचा

Back to top button