दूषित पाणी पुरवठा; टंचाईग्रस्तांची केली जातेय थट्टा! नागरिकांचा  संताप

दूषित पाणी पुरवठा; टंचाईग्रस्तांची केली जातेय थट्टा! नागरिकांचा संताप

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली वडाचीवाडी भीषण पाणीटंचाईचा सामना करत असतानाच गावात बंद नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील नागरिक जुलाब आणि उलट्यांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. पाणीटंचाईच्या झळा सहन करताना आता दूषित पाण्याने नागरिकांची परीक्षाच जणू पाहिली आहे.

पाऊस कमी झाल्याने वडाचीवाडी गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव यंदा कोरडाच आहे, त्यामुळे गाव भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. अशातच पालिकेद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. वडाचीवाडी गावासाठी असणारी पिण्याच्या पाण्याची लाईन व ड्रेनेज लाईन एकमेकांशेजारी असल्याने ड्रेनेज चेंबरचे पाणी पिण्याच्या पाईप लाईनमध्ये जात असल्याने संपूर्ण वडाचीवाडी गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन ड्रेनेज लाईनपासून दूर स्वतंत्र टाकण्यात येऊन नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी वडाचीवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

आधीच पाणीटंचाईचा सामना करतोय. वापरण्यासाठी पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. पिण्याचे पाणी नळाला कधीतरी येते. मात्र, तेही दूषित येत आहे. या दूषित पाण्यामुळे घरातील सदस्य आजारी पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.

– शिवाजी धनवडे, ग्रामस्थ, वडाचीवाडी.

एकीकडे पाणीटंचाईमुळे वडाचीवाडी ग्रामस्थ हैराण असताना दुसरीकडे मैलामिश्रित दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून पालिका येथील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ उपाययोजना कराव्यात. तोपर्यंत पिण्याच्या पाण्याचे टँकर वाढवावेत.

– दत्तात्रय बांदल, माजी सरपंच, वडाचीवाडी.

ड्रेनेज लाईनचे काम चालू असताना कोठेतरी लाईन तुटून हे सांडपाणीमिश्रित पाणी नळाला आले. मात्र, याबाबत काम सुरू असून, उद्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर नळाला पूर्ववत स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल.

– विज्ञान गायकवाड, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, स्वारगेट.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news