काळजी घ्या! शहरात प्रकृतीला अस्वस्थ करणारे वातावरण; यंदाचा उन्हाळा ठरतोय ‘ताप’दायक | पुढारी

काळजी घ्या! शहरात प्रकृतीला अस्वस्थ करणारे वातावरण; यंदाचा उन्हाळा ठरतोय 'ताप'दायक

आशिष देशमुख

पुणे : यंदाचा उन्हाळा पुणेकरांना खूप जड अन् त्रासदायक जात आहे. याचे मुख्य कारण शहराच्या उन्हाळी हवामानात (समर क्लायमेटॉलॉजी) यंदा मोठे बदल झाले आहेत. शहरात मार्च व एप्रिलमध्ये दरवर्षीच तापमान 40 अंशांवर जाते. यात नवीन काही नाही. मात्र, यंदा तापमानासह आर्द्रता सतत वाढत असल्याने उष्मांक खूप वाढला असून, अस्वस्थता (हीट डिस्कंफर्ट) वाढली आहे. त्यामुळे सतत अस्वस्थता, मळमळ, उलटी, चक्कर, अंगदुखी, गुडघेदुखी, अशी  लक्षणे वाढली आहेत.
शहराची समर क्लायमेटॉलॉजी आजवर अनेक वर्षे एकसारखी होती. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा 42 अंशांवर तर किमान तापमानाचा पारा 28 अंशांवर गेला. तर एप्रिलमध्ये 43.3 अंश तर किमान पारा तब्बल 32 अंशांवरही गेल्याची नोंदही सापडते. मात्र शहरातील उन्हाळा याआधी कधीच अस्वस्थ करणारा नव्हता. तो या वर्षी खूप जास्त त्रासदायक वाटत आहे. घरातून, कार्यालयातून बाहेर पडावे वाटत नाही. बाहेर पडलोच तर घशाला कोरड पडणे, अवस्थ वाटणे अशी लक्षणे वाढली आहेत. तज्ज्ञांच्या मते, असा उन्हाळा फक्त कोकण आणि गोवा भागात जाणवतो. कारण समुद्र जवळ असल्याने मार्च ते मेपर्यंत तेथे उष्ण व दमट हवामान तयार होते. मात्र पुणे आणि परिसरात उन्हाळ्यात कोरडे वातावरण राहते. यंदा उष्णतेसह आर्द्रतेत सतत चढ उतार वाढले आहेत, असे वातावरण प्रकृतीला अस्वस्थ करणारे ठरते.

शहराचे पूर्वीचे  उन्हाळी हवामान कसे होते?

(पुणे सिटी क्लायमेटॉलॉजी)
  • मार्च : सरासरी कमाल तापमान : 34.5 अंश
  • मार्च : सरासरी किमान तापमान : 19 अंश
  • एप्रिल : सरासरी कमाल तापमान : 37.3
  • सरासरी किमान तापमान : 21.2
  • आर्द्रता : सरासरी 46 ते 50 टक्के

यंदा तापमानातील बदल

  • कमाल तापमान : 27 मार्च 2024 : 39.6 अंश
  • किमान तापमान : 27 मार्च 2024 : 29 अंश
  • आर्द्रता : 68 ते 80 टक्के
  • एप्रिल 2024 : कमाल तापमान 43.6 (कोरेगाव पार्क)
  • एप्रिल किमान तापमान : 29 अंश
  • आर्द्रता : 80 ते 92 टक्के
सतत उन्हात फिरणार्‍यांनी किंवा बांधकाम, खोदकमाच्या साईटवर काम करणारांनी दर तासाला काम थांबवून पाणी पिणे गरजेचे आहे. एरवी दिवसाला 4 लिटर पाणी पुरेसे असते. पण उन्हाळ्यात 4 ते 6 लिटर पाणी प्यायला हवे. सतत उन्हात फिरत असला तर हीट क्रॅप येतात. म्हणजे पायात गोळे येणे अशी लक्षणे दिसतात. तेव्हा साधे पाणी, इलेक्ट्रॉलयुक्त पाणी प्या. तेही घेऊन फरक नाही पडला तर डॉक्टरांना दाखवले पाहिजे. लोक ही लक्षणे दिसत असूनही अंगावर काढतात. त्याचे रूपांतर हीट स्ट्रोकमध्ये होऊ शकते. सध्या अशी लक्षणे वाढलेले रुग्ण शहरात मोठ्या संख्येने येत आहेत.
-डॉ. अमित द्रविड,  विषाणू आजारतज्ज्ञ व जनरल फिजिशियन
यंदा सातत्याने शहरात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे आर्द्रता 80 ते 90 टक्क्यांवर भर उन्हाळ्यात जात आहे. एरवी ती सुमारे 50 ते 55 टक्के असते. तसेच शहरात राजस्थान आणि गुजरातच्या वाळवंटातून यंदा सतत उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे हीट डिस्कंफर्ट वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना आम्ही वारंवार सुती कपडे घाला, काम नसेल तर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत उन्हात फिरणे टाळा असा सल्ला देत आहोत.
-अनुपम कश्यपी, माजी हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा

हेही वाचा

Back to top button