राज्य सहकारी बँकेला 615 कोटींचा निव्वळ नफा : प्रशासक विद्याधर अनास्कर | पुढारी

राज्य सहकारी बँकेला 615 कोटींचा निव्वळ नफा : प्रशासक विद्याधर अनास्कर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आजवरचा उच्चांकी 615 कोटी रुपयांइतका निव्वळ नफा मिळाला आहे. बँकेला प्रशासक काळातच मागील तीन वर्षे सलग सहाशे कोटींच्यावर निव्वळ नफा मिळालेला आहे. शिवाय बँकेच्या 113 वर्षाच्या इतिहासात 57 हजार 265 कोटी रुपयांचा उच्चांकी व्यवसायही केलेला असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य बँकेने 31 मार्च 2024 अखेर कर्जाची 33 हजार 682 कोटी रुपयांची उच्चांकी पातळी गाठतांना मागील वर्षाच्या तुलनेत 7 हजार 232 कोटींनी भरीव वाढ साध्य केली आहे.

तसेच बँकेच्या मार्चअखेर एकूण 23 हजार 583 कोटींची ठेव पातळी गाठतांना मागील वर्षाखेरच्या ठेव पातळीमध्ये 4 हजार 969 कोटींची वाढ नोंदविताना ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळविले. परिणामी बँकेचे एकूण व्यवसाय गतवर्षाच्या तुलनेत 27 टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच 12 हजार 201 कोटींनी वाढून मार्चअखेर एकूण व्यवहार 57 हजार 265 कोटी रुपयांइतके झाल्याचे त्यांनी कळविले आहे.

बँकिंग व्यवहारात सुदृढतेचा निकष म्हणजे कोणत्याही बँकेचे नक्त मुल्य असून देशातील सर्व सहकारी बँकांमध्ये सर्वात जास्त नक्त मुल्य (नेटवर्थ) असलेली राज्य सहकारी बँक ठरल्याचा अभिमान आहे. 31 मार्च 2024 अखेर राज्य बँकेचे नक्त मुल्य 4 हजार 560 कोटी झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 681 कोटींची (18 टक्के) भरीव वाढ झाली आहे. बँकेची वैधानिक गंगाजळी व भाग भांडवल मिळून स्वनिधी 7 हजार 218 कोटी झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 657 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सीआरएआर 16.25 टक्के राखण्यात यश

भांडवल पर्याप्तता प्रमाण तथा सीआरएआर हा रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार किमान 9 टक्के राखणे बँकांना अनिवार्य आहे. राज्य बँकेने आपली नफा क्षमता टिकवून भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 16.25 टक्के राखले आहे. त्याचबरोबर कर्ज वाटपाचे ठेवींशी प्रमाणदेखील (सीडी रेशो) 81 टक्के राखून व्यावसायिक पध्दतीने व्यवहार हाताळले आहेत. गेल्या 5 वर्षात बँकेचा प्रती सेवक व्यवसायात 43 कोटी रुपयांवरुन दुप्पट वाढवत85 कोटींइतका साध्य केला आहे. गत वर्षाच्या तुलनेत यामध्ये 34 टक्के वाढ झाल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button