पाणी नसलेल्या जलवाहिनीला लावला मीटर; महापौर बंगल्यातील प्रकार | पुढारी

पाणी नसलेल्या जलवाहिनीला लावला मीटर; महापौर बंगल्यातील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापौर बंगल्यामधील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या जलवाहिनीलाच समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी मीटर बसविण्यात आले आहे. हे मीटर केवळ शोभेसाठी बसविण्यात आल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. महापालिकेकडून शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शहरात अडीच लाख मीटर बसविण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार मीटर बसविले गेले आहेत. मात्र, पालिका आयुक्तांच्या बंगल्यासह महापौर बंगला, जिल्हाधिकारी बंगला, तसेच शासकीय अधिकार्‍यांच्या बंगल्यांना मीटर बसविण्यात आलेले नाहीत.

त्यामुळे तेथे नेमका पाणी वापर किती होतो हे समजण्यासाठी हे पाणी मीटर बसविण्यात यावेत यासाठी सजग नागरिक मंचाकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यावर पालिका प्रशासनाने महापौर बंगल्याला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला मीटर बसवला असल्याचा दावा केला होता. मात्र, हे मीटर ज्या जलवाहिनीवर बसविण्यात आले आहे ते बंद असून, या बंगल्याशेजारी असलेल्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून घेतलेल्या दुसर्‍या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे हे मीटर केवळ शोभेेचे असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे. शहरातील सरकारी बंगल्यांना मीटर बसवावेत यामुळे ते प्रतिदिन प्रतिव्यक्ती 150 लिटर पाणी वापरतात की, जास्त वापरतात हे पुणेकरांना कळेल, अशी मागणी वेलणकर यांनी आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा

Back to top button