मिळकतकरासाठी तोडले पाणी..! भर उन्हाळ्यात संस्थेवर कारवाई केल्याने संताप | पुढारी

मिळकतकरासाठी तोडले पाणी..! भर उन्हाळ्यात संस्थेवर कारवाई केल्याने संताप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मिळकतकराची सात लाखांची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या अधिकार्‍यांनी एका संस्थेचे पाणी तोडले. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पाणीपुरवठा विभागाला कसलीही कल्पना नाही. शहरातील अनेक मोठ्या संस्थांकडे लाखो रुपयांची थकबाकी असताना केवळ एकाच संस्थेवर भर उन्हाळ्यात पाणी तोडण्याची कारवाई केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध विभागांकडून वसुली मोहिमा हाती घेतल्या जात आहेत.

त्यामुळे 2023-24 हे आर्थिक वर्ष संपताना प्रशासनाने थकबाकी वसुलीवर भर दिला होता. थकबाकी न भरणार्‍या नागरिकांच्या व्यावसायिक मिळकती सील करणे, मिळकतीपुढे बॅन्ड वाजविणे आदी पर्याय अवलंबिले जात आहेत. नागरिकांनी कर भरला नाही, तर त्यावर दरमहा दोन टक्के व्याज आकारले जात आहे. मिळकतकराची थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर मार्ग असताना मिळकतकर विभागाने भर उन्हाळ्यात गुरुवार पेठेतील एका संस्थेचे थेट पाणी तोडले आहे. दरम्यान, मिळकतकर विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नळ जोड तोडण्याची कारवाई केली असली तरी पाणी पुरवठा विभागाला याबाबत कोणतीही कल्पना नाही.

हेही वाचा

Back to top button