गदिमांच्या स्मारकाचे काम संथगतीने; सुमित्र माडगूळकर यांनी वेधले लक्ष | पुढारी

गदिमांच्या स्मारकाचे काम संथगतीने; सुमित्र माडगूळकर यांनी वेधले लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम संथगतीने सुरू असल्याकडे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी लक्ष वेधले. ग. दि. माडगूळकर यांचा 1 ऑक्टोबर रोजी जन्मदिन असून, तोपर्यंत किमान इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे. त्यानंतरच स्मारकातील दालनांची रचना आणि सजावटीचे काम सुरू होऊ शकेल, असेही त्यांचे म्हणणे आहे. स्मारकाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणीही माडगूळकर यांनी केली.

अनेक वर्षांपासून गदिमा स्मारकाचा प्रश्न रखडला होता. दैनिक ‘पुढारी’नेही स्मारकाच्या कामाबाबत लक्ष वेधले आहे. खूप पाठपुरावा केल्यानंतर आता कोथरूड येथील महात्मा सोसायटीजवळील एका व्यापारी संकुलामध्ये महापालिकेच्या वतीने गदिमा स्मारक साकारण्यात येत आहे. परंतु, अद्यापही स्मारकाचे काम संथगतीने सुरू आहे. गदिमा स्मारकाचा कोनशिला समारंभ होऊन येत्या मे महिन्यामध्ये जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. या ठिकाणी भेट दिली असता स्मारकाच्या इमारतीचा पहिला स्लॅब तयार झालेला दिसत आहे. महापालिकेच्या आराखड्यानुसार गेल्या वर्षभरात साधारण 60 टक्के स्मारकाचे काम झालेले दिसत असले, तरी हे काम संथगतीने सुरू आहे, असे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.

माडगूळकर म्हणाले, स्मारकाच्या कामाला अजून वेग येणे आवश्यक आहे. आराखड्यानुसार एक स्लॅब आणि आतील सजावट, असे काम बाकी आहे. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर आतील दालनांची रचना आणि सजावटीचे काम सुरू होऊ शकते. 1 ऑक्टोबर रोजी गदिमांचा 105 वा जन्मदिन असून, तोपर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर माडगूळकर कुटुंबीय, गदिमाप्रेमी आणि त्या क्षेत्रातील जाणकार लोकांची मदत घेऊन स्मारकाच्या आतल्या भागाची रचना करण्याचे मुख्य काम हाती घेता येईल. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घालून स्मारकाच्या कामाला गती द्यावी.

हेही वाचा

Back to top button