हे खालच्या पातळीचे राजकारण..: संजय मंडलिकांच्या विधानाचा शरद पवारकडून  समाचार | पुढारी

हे खालच्या पातळीचे राजकारण..: संजय मंडलिकांच्या विधानाचा शरद पवारकडून  समाचार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाहू महाराजांबाबत सामान्यांमध्ये कृतज्ञता असताना त्यांच्याबाबत सवाल करणे हे राजकारणाची पातळी खाली गेल्याचे दर्शविते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका केली. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, अशी टीका मंडलिक यांनी केली होती. त्यासंदर्भात पवार बोलत होते. पुण्यातील भाजपचे खेड तालुका समन्वयक अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. खासदार अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राजघराण्यात मूल दत्तक घेणं ही नवी पद्धत नाही. दत्तक मूल घेतल्यावर तो त्या घराण्याचा प्रतिनिधी होतो. आज ज्यांच्याबद्दल बोललं जात आहे, याचा अर्थ किती खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे हे दिसते. शाहू महाराज यांची जनमाणसात चांगली प्रतिमा आहे. त्यांच्याबद्दल बोललं जात आहे, याचा अर्थ मानसिकता काय आहे हे लक्षात घ्या, असेही पवार म्हणाले. पवार म्हणाले, मोदी यांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. इंदिरा गांधींनी एक छोटे बेट श्रीलंकेला दिल्यावरून आता चर्चा होते. त्याऐवजी चीनने भारताच्या भूमीवर केलेल्या अतिक्रमणावर काय उपाय योजले त्याची उत्तरे अपेक्षित आहेत.

नक्की माहीत नाही राज ठाकरे यांनी गेल्या पंधरा वर्षांत अनेक निर्णय घेतले. कधी भाजपवर कठोर टीका, तर कधी भाजपला बिनशर्त पाठिंबा, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी काल नक्की काय केले ते मला सांगता येणार नाही; राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयात मी काही केलेलं नाही, अशी कोपरखळी पवारांनी मारली.

मूळ पवार की बाहेरून आलेले

अजित पवार यांनी बारामतीकरांना पवार आडनावाला मदत करण्याचे आवाहन केले होते, त्यावर शरद पवार म्हणाले, अजित पवार बोलले ते खरेच आहे, त्यात चुकीचे असे काहीच नाही. पण मुद्दा असा आहे, की मूळ पवार की बाहेरून आलेले पवार?

हेही वाचा

Back to top button