शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? | पुढारी

शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले?

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केला. शरद पवार अनेक वर्षे केंद्रात मंत्री होते. सत्ता असूनही महाराष्ट्रासाठी ते काही करू शकलेले नाहीत. नांदेडकरांनी आता त्यांना यांचा हिशेब मागण्याची वेळ आली आहे. पवार यांनी दहा वर्षांत केवळ एक लाख 91 हजार कोटी महाराष्ट्राला दिले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत महाराष्ट्राला 7 लाख 15 हजार कोटी इतका निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

अखंड भारत आणि समृद्ध भारत हे काँग्रेसला मान्य नाही. पुढील काळात भारत जगातील सर्वात मोठी तिसरी आर्थिक शक्ती असेल, ही नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करून विकसित आणि समृद्ध भारताची मुहूर्तमेढ रोवा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस मिळून निवडणुकीत उतरली आहे. हे म्हणजे ‘तीन तिगाडा काम बिगाडा’ असल्याचा टोला शहा यांनी लगावला.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. गृहमंत्री शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन, उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर आदींची उपस्थिती होती.

शहा म्हणाले, काँग्रेसने 70 वर्षे काश्मीरमध्ये 370 कलम नवजात मुलाप्रमाणे सांभाळले. नरेंद्र मोदी यांनी हे कलम हटविल्यानंतर काँग्रेसचे नेते चवताळले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सत्ता सोडताना देशाची अर्थव्यवस्था जगात 11 व्या क्रमांकावर नेऊन सोडली होती. मात्र, मोदी यांनी ती पाचव्या क्रमांकावर आणली आहे, असे शहा म्हणाले.

काँग्रेसकडे ना नेता, ना नीती : फडणवीस

भाजप सरकारने मराठवाड्याचा विकास करताना समृद्धी महामार्ग, रेल्वेचे नेटवर्क उभारत विकास केला. मात्र, काँग्रेसकडे नेता आणि नीती नसल्याने पक्षाची वाताहत झाल्याचा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. संविधानावर आमचा विश्वास आहे. त्याला धक्का लागणार नाही, अशी गॅरंटी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

Back to top button