Loksabha election | चारही मतदारसंघांत नियोजन पूर्ण : जिल्हाधिकारी सुहास दिवसे | पुढारी

Loksabha election | चारही मतदारसंघांत नियोजन पूर्ण : जिल्हाधिकारी सुहास दिवसे

बारामती : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चारही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक नियोजन पूर्ण झाले आहे. निवडणुकीसाठी 68 हजार कर्मचारी तैनात असून, अधिकारी-कर्मचार्‍यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. जिल्ह्यात 23 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत, परंतु निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतल्याचे ते म्हणाले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणुकीसाठी आम्हाला कर्मचार्‍यांची कोणतीही अडचण नाही.

मतदान केंद्रांची पाहणी पूर्ण झाली असून सर्व बाबी पूर्णत्वाला गेल्या आहेत. पुढील पाच दिवसांत मतपेट्या विधानसभा क्षेत्रात पोहोचतील. उमेदवार ठरतील त्यानुसार उमेदवार सूची तयार करून मतदानासाठी ही यंत्रे सज्ज ठेवली जातील. मतदार याद्यांमध्ये काही ठिकाणी चुका झाल्याचे दिसून आले. काही डॉक्टर व अन्य मंडळींना मतदानाचे काम दिले गेल्याचे आढळून आले होते, या चुका दुरुस्त झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुणे, पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांसोबत, जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. मतदार यादीत नाव नोंदवण्याचे काम अजूनही सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 10 दिवस अगोदर मतदार यादी
अंतिम होईल.  निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर येणार्‍या तक्रारींचे निवारण केले जात आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. निकोप वातावरणात निवडणुका पार पडतील, याची दक्षता घेतली जात असल्याचे ते म्हणाले.

बारामती मतदारसंघासाठी विजय कुमार निरीक्षक

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हीसमधील 2010 च्या बॅचचे अधिकारी विजय कुमार यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ते लवकरच मतदारसंघात दाखल होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.

मतमोजणी केंद्राची दिली माहिती

बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एफसीआय, कोरेगाव पार्क, पुणे येथे तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची रांजणगाव येथे तर मावळची मतमोजणी बालेवाडीत होणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button