विकासात्मक विकाराने मूलं त्रस्त : सकारात्मक वर्तनासाठी जाणून घ्या वैद्यकतज्ज्ञांचा सल्ला | पुढारी

विकासात्मक विकाराने मूलं त्रस्त : सकारात्मक वर्तनासाठी जाणून घ्या वैद्यकतज्ज्ञांचा सल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, दर 68 मुलांपैकी 1 मूल विकासात्मक विकाराने त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. अनुवांशिता, प्रदूषण, गर्भवतीची स्थुलता, मधुमेह, रोगप्रतिकारकशक्ती कमी असणे, अकाली जन्म, जन्माच्या वेळी बाळाचे वजन खूपच कमी असणे यांसारख्या कारणांमुळे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर होऊ शकतात, असे वैद्यकतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. मीनाक्षी कांबळे म्हणाल्या, ‘न्यूरॉलॉजिकल आजार गुंतागुंतीचे असतात, फक्त व्यक्तीच्या आचरणावरच नव्हे, तर आरोग्य आणि कल्याणावर त्यांचा परिणाम होतो, त्यामुळे ते लवकरात लवकर ओळखले जाऊन त्यावर योग्य वेळी उपचार केले गेले पाहिजेत. ऑटिझमग्रस्तांची काळजी घेण्याच्या बाबतीत सर्वसमावेशक दृष्टिकोन अवलंबिला जायला हवा. त्यासाठी सकारात्मक वर्तन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.’

एकाग्रता आणि सकारात्मक शिक्षण कौशल्यांमध्ये सुधारणा घडवून आणून, शाळेत नवीन कौशल्ये शिकण्यातदेखील यामुळे मदत होते. मुलांच्या सकारात्मक विकासासाठी थेरपिस्ट आणि बालरोगतज्ज्ञांकडून लवकरात लवकर उपचार करून घेतले पाहिजेत. पहिल्या सहा वर्षांमध्ये जास्तीत जास्त सुधारणा घडून येणे शक्य असते. त्यामुळे वेळ वाया घालवता कामा नये. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आणि एबीए थेरपिस्ट यांनी लवकर विश्लेषण करून उपचार पुरवले पाहिजेत. घरी आणि शाळेत शिकण्याच्या निरोगी पद्धतींना प्रोत्साहन दिल्यास उपचारांचा प्रभाव वाढतो.

हेही वाचा

Back to top button