जादा पैसे मोजूनही होईना रेल्वेतून निसर्गदर्शन? काचा अस्वच्छ; प्रवाशांनी नाराजी | पुढारी

जादा पैसे मोजूनही होईना रेल्वेतून निसर्गदर्शन? काचा अस्वच्छ; प्रवाशांनी नाराजी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे आणि प्रवास करताना दिसणारी अस्वच्छता, ही सध्या काळ्या दगडावरची पांढरी रेघच झाली आहे. अशीच घटना नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या ‘व्हिस्टाडोम’ कोचबाबत घडली आहे. या डब्याच्या नयनरम्य निसर्गाचे दर्शन घडवणार्‍या काचाच अस्वच्छ असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हिस्टाडोम कोचसह रेल्वे गाड्यांमधील अनेक ठिकाणच्या स्वच्छतेकडे रेल्वे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. पुणे- मुंबई, पुणे- गोव्यासह अन्य ठिकाणी रेल्वे प्रवासादरम्यान असलेली नयनरम्य दृश्य प्रवाशांना गाडीत बसल्या जागेवरून पाहाता यावीत, याकरिता रेल्वे प्रशासनाने नवीन संकल्पना आखत, व्हिस्टाडोम कोचची निर्मिती केली. या डब्यांसाठी अधिकचे दर आकारून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या सेवेला अधिकचे तिकीट दर असले तरी प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या अत्याधुनिक सुविधा असलेल्या, स्वच्छ प्रवास घडवणार्‍या या डब्यांना अलीकडील काळात ग्रहण लागत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच पुणे- मुंबई दरम्यान धावणार्‍या प्रगती एक्स्प्रेस (ट्रेन नं.12125)मध्ये असलेल्या व्हिस्टाडोम कोचच्या काचाच पूर्णत: अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

व्हिस्टाडोमसाठी हजार रुपये भरून काय फायदा ?

रेल्वेने पुणे- मुंबई प्रवास करायचा म्हटलं तर अक्षरश: 90, 100, 300 ते 400 रुपयांपासून करता येतो. मात्र, वंदे भारत गाडी आणि व्हिस्टाडोम कोचसाठी प्रवाशांना 900, 1000 ते 1200 रुपयांच्या घरात पैसे भरावे लागत आहेत. मात्र, व्हिस्टाडोम डब्याची अशी स्थिती असेल तर प्रवासी नाराज होणारच आहेत.

प्रवासी म्हणतो…

या घटनेबाबत ‘एक्सवर’ प्रवासी अंकित बगारिया म्हणतो, नुकताच प्रगती एक्स्प्रेसमधील व्हिस्टाडोम कोचने प्रवास केला. याकरिता मला हजार रुपये तिकिटासाठी भरावे लागले. मात्र, या कोचच्या काचांची स्थिती अतिशय खराब होती. आमच्याकडून एवढे पैसे घेता तर तशी सुविधाही द्यावी, नाही तर हजार रुपये भरून काय फायदा ?

हेही वाचा

Back to top button