मार्गदर्शकांना संशोधविद्यार्थ्यांकडून भेटवस्तू, पार्टीची अपेक्षा; विद्यापीठाची बदनामी | पुढारी

मार्गदर्शकांना संशोधविद्यार्थ्यांकडून भेटवस्तू, पार्टीची अपेक्षा; विद्यापीठाची बदनामी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. मार्गदर्शक आणि सांगवीतील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेला लाच घेताना नुकतेच रंगेहात पकडण्यात आले. चिरीमिरीच्या वसुलीमुळे मार्गदर्शकांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यापीठाने अशा प्रकारची गाईड लॉबी तातडीने मोडीत काढावी, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांसह प्राध्यापक आक्रमक झाले आहेत.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांत विविध विषयांची संशोधन केंद्रे देण्यात आली. तसेच, पीएच.डी. मार्गदर्शकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा फायदा संशोधनाला होण्याऐवजी मार्गदर्शक प्राध्यापकांसाठी संशोधन केंद्रे म्हणजे चिरीमिरीचे ठिकाण बनले आहेत. पीएच.डी. संशोधन केंद्रांवर विद्यापीठाचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही, तर पीएचडीचे ऑनलाईन पोर्टल केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. पुरेशा सुविधा नसतानाही अनेक ठिकाणी संशोधन केंद्रे देण्यात आली आहेत, तर पीएचडीचे मार्गदर्शक विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांना अडथळा कसा निर्माण होईल आणि यातून संशोधक विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू किंवा एखादी पार्टी कशी मिळेल, हे पाहण्यातच धन्यता मानत असल्याची माहिती काही संशोधक विद्यार्थ्यांनी दिली आहे.

पीएचडी करून तातडीने नोकरीला लागण्यासाठी संशोधक विद्यार्थी मार्गदर्शकांची मनमानी सहन करतात. तसेच, त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास धजावत नाहीत. याचाच फायदा घेऊन काही मार्गदर्शक त्यांना हवी तशी मनमानी करतात. अशा मनमानी करणार्‍या मार्गदर्शकांची एक लॉबीच तयार झाली आहे. त्यांच्याविरोधात विद्यापीठाकडे कोणी तक्रार केली, तर त्याकडे विद्यापीठ प्रशासनदेखील गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येते. यासंदर्भात महापेरेंट्स पालक संघटनेचे दिलीप सिंग विश्वकर्मा हे विद्यापीठाला पत्र देणार असून, त्यांनी पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. तसेच, मागण्यांचा योग्य विचार केला नाही, तर विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे.

महापेरेंट्स पालक संघटनेच्या काय आहेत मागण्या..

  • मार्गदर्शकांच्या (गाईड) मानधनात वाढ करावी.
  • भ्रष्टाचारी गाईड लॉबी मोडून काढावी
  • गाईडसाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण केला पाहिजे.
  • इंटरव्ह्यूच्या ठिकाणी मोठे फलक लावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.
  • ‘व्हायवा’च्या तारखांमध्ये जाणीवपूर्वक उशीर करून, विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून, त्यांच्याकडून पार्ट्या आणि पैसे मागणार्‍या मार्गदर्शकांवर कारवाई करावी
  • तक्रार असलेल्या मार्गदर्शकांना विद्यापीठाने त्वरित ब्लॅकलिस्ट करावे.

मार्गदर्शकांनी लाच घेणे हा वर्तणुकीचा विषय आहे. परंतु, विद्यापीठ आता लवकरच संशोधन केंद्रांचे संचालक आणि त्यांच्याशी संलग्न मार्गदर्शकांची कार्यशाळा आयोजित करणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक सेवा आणि सुविधा देणे केंद्रांना बंधनकारक करण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाने पीएचडीचे जे नवीन पोर्टल तयार केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना गोपनीय पद्धतीने तक्रारही करता येणार आहे.

– डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

हेही वाचा

Back to top button