‘लिडकॉम’च्या योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा : अमोल शिंदे | पुढारी

‘लिडकॉम’च्या योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा : अमोल शिंदे

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील महिलांनी उद्योजक बनणे आवश्यक आहे. महिलांनी ध्येय निश्चित करून अगदी कमी भांडवलात सुरू होणार्‍या व्यवसायाकडे लक्ष दिल्यास त्या उद्योजक बनू शकतात. महिला कमावत्या झाल्यानंतर त्यांना समाजात एक वेगळे स्थान मिळते. त्यामुळे महिलांनी व्यवसाय करावा. व्यवसाय सुरू करण्यासाठी संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ मदत करेल. या महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लिडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक अमोल शिंदे यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील चर्मकार, ढोर, होलार, मोची समाजातील नागरिकांसाठी संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ (लिडकॉम) व महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण संस्था (एमसीईडी) यांच्या वतीने एक महिन्याचा तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या वेळी शिंदे बोलत होते. शिंदे यांनी लिडकॉमच्या महिला समृद्धी योजना, मुदत कर्ज योजना, बीज भांडवल योजना, शैक्षणिक कर्ज योजना, गटई स्टॉल योजना, मोफत प्रशिक्षण योजना आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच, योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणा-या आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.

संत रोहिदास सुवर्ण जयंती उद्योजकता विकास प्रशिक्षण योजनेंतर्गत पुढील 3 वर्षांत 25 हजार चर्मकार, ढोर , होलार, मोची समाजातील नागरिकांना प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धमज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके, कार्यक्रम अधिकारी रामदास पवार, माधवी सोनवीस, नवनाथ शिंदे आदींसह लाभार्थी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button