मिळकतींची बिले स्पीड पोस्टाने पाठवणार : अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार | पुढारी

मिळकतींची बिले स्पीड पोस्टाने पाठवणार : अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मिळकत कराची बिले मिळत नसल्याने कर भरता आला नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन यंदा प्रथमच महापालिकेकडून अडीच लाख बिले स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. महापालिकेला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 2 हजार 90 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न 314 कोटी रुपयांनी अधिक आहे. समाविष्ट गावांसह शहरात सुमारे 14 लाख मिळकतींची नोंदणी झाली असून यापैकी सुमारे साडेबारा लाख मिळकती जुन्या हद्दीत आहेत.

आतापर्यंत 9 लाख 53 हजार मिळकतधारकांनी कर भरणा केला आहे. काही मिळकतधारक बिल मिळत नसल्याच्या तक्रारी करतात. अपूर्ण पत्ते, चुकीची नावे, दुबार आकारणी अशा विविध कारणास्तव थकबाकी राहते. त्यावर दंड आकारला जाऊन रक्कम मोठी होत असल्यानेही नागरिक बिल भरण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, महापालिकेच्या लेखी थकबाकी दिसून येते. यावर उपाय म्हणून महापालिकेने अशा तक्रारदारांना स्पीड पोस्टाद्वारे बिल पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. स्पीड पोस्टाने बिल पाठविताना संबंधित मिळकतधारकाचा शोध घेऊन त्याचा अचूक पत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल अ‍ॅड्रेस नोंदविण्याचे कामही टपाल विभागाकडून केले जाणार आहे. यामुळे मिळकतधारकांची अपडेटेड माहिती कर विभागाकडे येणार आहे. आगामी वर्षात अडीच लाख मिळकतधारकांना स्पीड पोस्टाने बिले पाठविण्यात येणार असून प्रत्येक बिलासाठी 12 ते 14 रुपये खर्च येणार आहे. स्थायी समितीमध्ये याला मान्यता देण्यात आली आहे.

तीन हजार मिळकतींना ‘सील’

मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणार्‍यांच्या तीन हजार मिळकती सील करण्यात आल्या आहेत. मिळकत सील केल्यानंतर यापैकी काहींनी तातडीने थकबाकी जमा केली आहे, असे कर आकारणी विभागाचे प्रभारी उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button