महत्वाची बातमी ! फुंडकर फळबाग योजनेसाठी 50 कोटींचा निधी | पुढारी

महत्वाची बातमी ! फुंडकर फळबाग योजनेसाठी 50 कोटींचा निधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनुदानाचे 50 कोटी रुपये कृषी विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मार्चपूर्वी संबंधित पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर मंजुरीनुसार अनुदान मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान, फुंडकर योजनेतून चालू वर्षी नव्याने 15 हजार 925 हेक्टरवर फळबाग लागवड झाली असून, सुमारे 29 कोटी 95 लाख रुपयांचे अनुदान वितरण झाले आहे. केंद्र सरकारच्या महात्मा या ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) जे शेतकरी फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकर्‍यांना फुंडकर फळबाग योजनेचा लाभ राज्य सरकारच्या वतीने देण्यात येतो. मनरेगातील जाचक अटींमुळे शेतकर्‍यांचा कल मनरेगाऐवजी फुंडकर फळबाग लागवड योजनेस राहतो.

यंदाच्या 2023-24 च्या आर्थिक वर्षात फुंडकर फळबाग योजनेसाठी 104 कोटी 50 लाख रुपयांच्या अनुदान निधीस प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन संचालकांनी शासनास अनुदान निधी वितरित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार 4 जानेवारी रोजी 20 कोटींचे अनुदान प्रथम वितरित करण्यात आले होते, तर योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा अनुदान निधी 50 कोटी रुपये कृषी आयुक्तालयास नुकताच देण्यात आला आहे. तसेच दिलेल्या अनुदानाचा निधी तातडीने खर्च करावा आणि तो बँक खात्यावर पडून राहणार नाही, याची दक्षता कृषी आयुक्तालयाने घेण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळझाडे लागवड केलेल्या योजनेतील पात्र शेतकर्‍यांनी अनुदानाबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपले अनुदान प्राप्त करून घ्यावे.

– डॉ. कैलाश मोते, फलोत्पादन संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे

हेही वाचा

Back to top button