लष्कर पाणीपुरवठा केंद्रावर महिलांचा मोर्चा : नागरिक आक्रमक

लष्कर पाणीपुरवठा केंद्रावर महिलांचा मोर्चा : नागरिक आक्रमक

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : कोंढव्यातील इशरतबाग वसाहतीत पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आधी आम्हाला वेळेवर भरपूर पाणी मिळत होते; आता अचानक काय झाले? असा प्रश्न उपस्थित करीत परिसरातील महिला व नागरिकांनी लष्कर पाणीपुरवठा केंद्रावर मोर्चा काढून आधिकार्‍यांना घेराव घातला. अनधिकृत नळजोडणी करणार्‍यांवर कारवाई करून आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

प्रभाग क्रमांक 26 मधील इशरतबाग वसाहतीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी माजी नगरसेविका नंदा लोणकर यांच्या नेतृत्वाखाली लष्कर पाणीपुरवठा केंद्रावर मोर्चा काढत अधिकार्‍यांना घेराव घालला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. इशरतबाग वसाहतीत अनधिकृत नळजोड करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, येत्या सात दिवसांत या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी नागरिकांनी आधिकार्‍यांना दिला आहे.

इशरतबाग परिसराची लोकसंख्या 5 हजारांपेक्षा जास्त असून, या भागात अवघे दोन मीटरचे रस्ते आहेत. यामुळे या ठिकाणी टँकर देखील जात नाहीत. एनआयबीएम कॅम्पसपासून एक किलोमीटर व लष्कर पाणीपुरवठा विभागापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर हा भाग आहे. सध्या या परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत असून, त्यांना आमच्या वाट्याचे पाणी अनधिकृतपणे दिले जात आहे. त्यामुळे आम्हाला पाणी मिळत नसल्याचा आरोप या वेळी नागरिकांनी केला. याबाबत लष्कर पाणीपुरवठा केंद्राचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. माजी शिक्षण मंडळ सदस्य नारायण लोणकर, झोयब काझी, रुबिना शेख, सुलताना जमादार, समीर शेख आदींसह वसाहतीमधील शेकडो महिला आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

इशरतबाग वसाहतीमध्ये गेल्या काळात पाणीपुरवठा सुरळीत होत होता. मात्र, ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.

– नंदा लोणकर, माजी नगरसेविका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news