विजय शिवतारेंनी खंडेरायाच्या दर्शनाने फोडला प्रचाराचा नारळ.. | पुढारी

विजय शिवतारेंनी खंडेरायाच्या दर्शनाने फोडला प्रचाराचा नारळ..

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात ‘नमो विचार मंच’च्या माध्यमातून अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाचे, तसेच मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी (दि. 13) आपला प्रचार ही सुरू केला आहे. बारामतीची निवडणूक एकाच कुटुंबात न राहता सर्वसामान्य जनेतेची व्हावी, यासाठी सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी उभा राहत आहे, असे शिवतारे यांनी सांगितले.

या वेळी जेजुरी गडावर दै. ‘पुढारी’शी बोलताना शिवतारे म्हणाले की, काही गोष्टी नियती घडवीत असते. आज पवार नावाच्या प्रवृत्ती विरोधात आणि लोकांना वेठीस धरण्याच्या वृत्ती विरोधात सर्वसामान्य जनतेची ही लढाई आहे, त्याचे प्रतिनिधित्व मी करीत आहे. बारामतीचा विकास झाल्याचे देशभर प्रदर्शन केले, परंतु या बाबी योग्य प्रकारे पुढे आणल्या जात नाहीत. फक्त बारामती शहराचाच विकास केला जातो, अवर्षणग्रस्त सुपा परिसरामध्ये अद्याप पाण्याची कमतरता आहे. त्या ठिकाणी प्यायला पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती असताना या ठिकाणी सर्व अलबेल आहे, असे सांगितले जात आहे. महायुतीमध्ये अजित पवार असले तरी सर्व ‘क्लीन’ झाले असे नाहीये. अजित पवार यांच्या सौभाग्यवती निवडणुकीत उभे राहात आहेत म्हणून त्यांना आम्ही मतदान का करायचे, असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा

Back to top button