पाण्याला त्रस्त महिला ‘मिनरल वॉटर’ पिऊन वाजवताहेत टाळ्या | पुढारी

पाण्याला त्रस्त महिला 'मिनरल वॉटर' पिऊन वाजवताहेत टाळ्या

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दौंड तालुक्यात महिलांच्या सन्मान सोहळ्यांचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. गावातील नळाच्या पाण्याला त्रस्त झालेल्या महिला या सोहळ्यामध्ये ‘मिनरल वॉटर’ पिऊन टाळ्या वाजवताना दिसत आहेत. हळदी-कुंकू आणि महिला सन्मान सोहळा हा तालुक्यातील रंगतदार कार्यक्रम बारामतीच्या पवारांच्या सन्मानासाठी होत असला तरी या सोहळ्यातून ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळ्या स्वरूपाची आमिषे दाखविण्यात येऊ लागली आहेत.

शरद पवार यांची कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्यातही बारामतीच्या सन्मानाची लढाई जोरात सुरू आहे. नेमके कोणते पवार विजयी झाल्यावर हा सन्मान वाढणार आहे, हे मात्र काही कळेनासे झाले आहे. या दोघींनीही बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महिला सन्मान मेळावे घेण्याचा धडाका लावला आहे. सुनेत्रा पवार यांनी हळदी-कुंकवाच्या नावाखाली दौंड शुगर साखर कारखान्यावर मेळावा घेऊन महिलांना साड्या वाटप केले. या मेळाव्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह नगरपालिकेच्या महिला कर्मचार्‍यांना आमंत्रित करताना गावपातळीवरील आपल्या पक्षाच्या समर्थकांकडून गावागावांतील महिलांना बोलावण्यात आले होते. या मेळाव्याची चर्चा पूर्ण दौंड तालुक्यात झाली.

दुसरा सोहळा पाटस येथील ग्रामपंचायतच्या आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 12) घेण्यात आला. या वेळी महिलांना भेटवस्तू देण्यात आली. आरोग्य शिबिराच्या नावाखाली स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाला बोलावण्यात आले होते. बचत गटाच्या माध्यमातून खाद्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. पाटस येथील मेळाव्यासाठी माजी आमदार रंजना कुल यांच्यासह अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, गावच्या सरपंच तृप्ती भंडलकर, उपसरपंच जयवर्धन शितोळे यांच्यासह त्यांचे सदस्य आणि सहकारी मित्र उपस्थित होते.

दौंड तालुक्यात सुनेत्रा पवार महिलांचे मेळावा घेत असल्या तरी सुप्रिया सुळे या गावागावांत जाऊन व्यापार्‍यासह गावकर्‍यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सुळे आणि पवार यांच्या या प्रचाराच्या धूमधडाक्याने महिलांचा सन्मान कमी आणि कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचा प्रयत्न त्यांचे समर्थक करत असले तरी सुळे यांचा प्रत्यक्ष गाठीभेटीने केडगाव, दौंड बाजारपेठेत मोठा धुमाकूळ सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत लढत कोणाकोणाची होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा

Back to top button