शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! आता मिळणार दिवसा वीज | पुढारी

शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! आता मिळणार दिवसा वीज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कृषी क्षेत्रासाठी सुमारे 9,000 मेगावॅट सौरऊर्जेसाठी विकसकांना देकारपत्र (लेटर ऑफ अ‍ॅवॉर्ड) देण्यात आले. त्यामधून चाळीस हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्याद्वारे 25 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे पुढच्या वर्षी 40 टक्के कृषी फीडर हे सौरऊर्जेवर येणार आहेत. परिणामी, शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे.
या योजनेसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकारपत्र मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी 2016 मध्ये सौर कृषिवाहिनी योजना प्रारंभ केली होती. त्यानंतरच्या काळात 2,000 मेगावॅटपर्यंत निर्मिती करण्यात आली. आता 9,000 मेगावॅट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे 40 टक्के कृषी फीडर हे सौरऊर्जेवर येतील.

आजचा दिवस ऐतिहासिक

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्यातील असंख्य शेतकर्‍यांची दिवसा विजेची सातत्याने मागणी होती. ही मागणी आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. सर्वात आधी सौरऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) येथे साकारण्यात आली, ती यशस्वी झाली. राज्यात 3,600 मेगावॅट सौरऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे; पण आता अवघ्या 11 महिन्यांत 9,000 मेगावॅटची प्रक्रिया राबवून शासनाने नवा विक्रम घडविला आहे. सरकारने कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध केल्याने हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य झाले आहे. या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे.

हुडकोसोबत सामंजस्य करार

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेत शेतकर्‍यांना 1.25 लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे दिले जाते. यावेळी हुडकोसोबत एक सामजंस्य करारसुद्धा करण्यात आला. यामधून 5 हजार कोटी रुपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मिळणार आहेत. रिलायन्ससोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जानिर्मितीसाठी सामंजस्य करारसुद्धा करण्यात आला. या करारामुळे राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जानिर्मिती क्षेत्रात बूस्ट मिळणार आहे.

हेही वाचा

Back to top button