मी शरद पवार आहे, माझा नाद करू नका : शरद पवारांचा आ. शेळकेंना दम | पुढारी

मी शरद पवार आहे, माझा नाद करू नका : शरद पवारांचा आ. शेळकेंना दम

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : तुम्ही आमदार कोणामुळे झालात, कार्यकर्त्यांना दम देण्यापूर्वी याचा विचार करा. मी शरद पवार आहे, माझा नाद करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना सज्जड दम दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शरद पवार बोलत होते. तत्पूर्वी, माजी मंत्री मदन बाफना यांनी आपल्या भाषणात आमदार शेळके हे कार्यकर्त्यांना दमदाटी करीत असल्याचे सांगत खुद्द मलादेखील त्यांनी दम दिल्याचे शरद पवार यांच्यापुढे सांगितले. यावर शरद पवार यांनी आमदार शेळके यांचा समाचार घेतला. तुमच्या निवडणूक अर्जावर अध्यक्ष म्हणून सही कोणी केली, तुमचा प्रचार कोणी केला, सभा कोणी घेतली, याचा विचार करा, असा इशारा पवार यांनी शेळके यांना दिला. शरद पवार यांनी यावेळी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही जोरदार टीका केली. मोदी सरकारच्या काळात देशात बळीराजाला आत्महत्या करण्याची परिस्थिती

आली आहे. देशात भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकले असून, आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मागे ते लागले असल्याचा आरोप पवार यांनी केला. या वेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, माजी महापौर संजोग वाघिरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, रमेशचंद्र नय्यर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, चंद्रकांत सातकर, कुमार धायगुडे, नंदकुमार वाळूंज, नासीर शेख, यशवंत ऊर्फ बाळासाहेब पायगुडे, विनोद होगले, अतुल राऊत, भारती शेवाळे, सुरेश चौधरी, दत्तात्रय गोसावी, फिरोज शेख, सुधीर कदम, श्वेता वर्तक, शिवसेनेचे तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, शादान चौधरी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोणावळा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवाय तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील काही पदेदेखील जाहीर करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या नासिर शेख यांच्याकडे लोणावळा शहराच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय श्वेता वर्तक यांच्याकडे महिला आघाडी तर अजिंक्य कुटे यांच्यावर युवक आघाडीची जबाबदारी देण्यात आली आहे.

कुणाला धमकावल्याचे दाखवा; जाहीर माफी मागेन : आ. शेळके

दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी केलेले आरोप फेटाळले. शरद पवार आमच्यासाठी आजही श्रद्धेय आहेत. मी कुणाला फोन केला, धमकावले, अशी एक तरी व्यक्ती दाखवा. मी जाहीर माफी मागेन. नाही तर शरद पवारांनी मावळमध्ये येऊन माझ्यावर खोटे आरोप केले, असे मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार. याबाबतीत शरद पवारांना प्रत्यक्ष भेटून माझी काय चूक झाली हे विचारणार असल्याचेही शेळके म्हणाले.

हेही वाचा

Back to top button