महापालिका अर्थसंकल्प-2024-25 : प्रमुख विभागांच्या निधीत मोठी भर | पुढारी

महापालिका अर्थसंकल्प-2024-25 : प्रमुख विभागांच्या निधीत मोठी भर

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनावरील ताण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात प्रमुख विभागांची तरतूद वाढविली आहे. त्यात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, पुल, आरोग्य, शहरी वनीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 30 लाखांवर गेली आहे. त्या दृष्टीने अर्थसंकल्पात प्रमुख विभागांचा निधी मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनीसह जलउपसा केंद्र उभारणीचे काम सुरू आहे.

आंद्रा धरण पाणी योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. निगडी ते दापोडी मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पवना बंद जलवाहिनीही नव्याने हाती घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाचा निधी वाढवून तब्बल 374 कोटींवर नेण्यात आला आहे. शहरात तब्बल 61 किलोमीटर अंतराचे रस्ते नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच, मामुर्डी- सांगवडे, मिलिटरी डेअरी फार्म येथे नव्याने पुलही बांधण्यात येणार आहेत. त्या कामासाठी सर्वाधिक तब्बल 1 हजार 771 कोटी 77 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा 32 कोटींने जादा निधी आहे.

शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रूंदीचे रस्ते रोड स्वीपर मशिन वाहनांने साफसफाई सुरूवात झाली आहे. ओला व सुका कचरा वेगळा देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. स्वच्छता सर्वेक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे स्वच्छता व घनचकरा व्यवस्थापनावर गेल्या वर्षीच्या तुलनेत 51 कोटी 98 लाखांची वाढ करीत ती 530 कोटी 40 लाखांवर नेण्यात आली आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी म्हणून जिजाऊ क्लिनिक उभारून विविध रूग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीही वाढविण्यात येत आहे. बर्न वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. मोशी येथे 700 बेडचे रूग्णालयात बांधले जाणार आहे. आरोग्य सेवेसाठी तब्बल 530 कोटी 40 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button