असे असेल हडपसरचे नवीन रेल्वे टर्मिनल ! | पुढारी

असे असेल हडपसरचे नवीन रेल्वे टर्मिनल !

प्रसाद जगताप

पुणे : बहुप्रतीक्षित हडपसर रेल्वे टर्मिनलच्या विकासाला आता युद्धपातळीवर सुरुवात झाली असून, त्याचे काम 25 टक्क्यांपर्यंत होत आले आहे. दररोज येथून सुमारे 10 हजार प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. टर्मिनल विकासाचे काम पूर्ण झाल्यावर ते कसे दिसणार याचे संकल्पचित्र दै. ‘पुढारी’च्या हाती लागले आहे.
भव्य अशा हडपसर टर्मिनलचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत भारत योजनेंतर्गत करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे विभागाला 24.86 कोटी रुपयांचा निधी  मिळाला आहे. रेल्वे बोर्डाकडून येथील नवीन लाईन करणे आणि स्थानक परिसराची लांबी वाढविण्यासह अन्य कामांसाठी 135 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.  असा एकूण सुमारे 160 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आतापर्यंत टर्मिनलचे 25 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण आले आहे. येत्या काही दिवसांत प्रवाशांना या सुसज्ज टर्मिनलचा वापर करता येणार आहे.

फीडर बससह रस्त्याची आवश्यकता

हडपसर टर्मिनलला जाण्यासाठी रस्त्याची पुरेशी अशी सुविधा नाही. त्यामुळे पीएमपीची फीडर सेवा पुरविताना अडचण होत आहे. आगामी काळात हे टर्मिनल साकारल्यावर पुणे महानगर पालिका येथे रस्त्याची सुविधा कशी करणार आणि पीएमपीएमएल प्रशासन येथे फीडर बसची सुविधा कशी करणार, असा सवाल पुणेकर प्रवाशांकडून केला जात आहे.
हडपसर टर्मिनलच्या विकासकामाला सुरुवात झाली आहे. अमृत भारत योजनेंतर्गत हे काम सुरू असून, आत्तापर्यंत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत झाले आहे. लवकरच उर्वरित कामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. प्रवाशांना उत्तम दर्जाची सुविधा देण्यात येणार आहे.
डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

या सुविधा मिळतील

  • हडपसर रेल्वे स्थानकाचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास करण्यात येत आहे. यात नवीन अतिरिक्त लूप लाईन्सची तरतूद असून, नवीन स्टेशन इमारत 21 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे.
  • या टर्मिनलला दोन नवीन प्रवेशद्वार असतील. मुख्य प्रवेशद्वार इमारतीच्या आकर्षक थीमवर आधारित असेल.
  • नवीन बुकिंग ऑफिस आणि एटीव्हीएम मशिन
  • फर्स्ट आणि सेकंड क्लास वेटिंग रूम आणि व्हीआयपी लाउंज
  • फूड प्लाझा आणि कॅफेटेरिया, क्लॉक रूम, रिटायरिंग रूम आदी
  • कुली रूम, पार्सल ऑफिस, चाइल्ड केअर रूम
  • नवीन सुधारित टॉयलेट ब्लॉक्स आणि वॉटर बूथ
  • जमिनीखालील आणि ओव्हरहेड पाण्याची टाकी
  • संपूर्ण कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म
  • नवीन फर्निचरसह प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूममध्ये आसन क्षमता वाढवली जाईल
  • रूफ प्लाझा आणि 2 एस्केलेटरसह 12 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज
  • बहुमजली पार्किंगच्या तरतुदीसह संरक्षित पार्किंगचा विकास
  • रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, पादचारी मार्गांसह परिभ्रमण क्षेत्राचा विकास
  • दिव्यांगजन फ्रेंडली टॉयलेट आणि वॉटर बूथ
  • बुकिंग काउंटर तसेच रॅम्प आणि स्वतंत्र पार्किंग
  • नवीन 12 मीटर रुंद एफओबी (फूट ओव्हर ब्रिज) रॅम्प
  • ट्रेनची माहिती प्रणाली
  • जीआरपी आणि आरपीएफ कार्यालय

हेही वाचा

Back to top button