अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांची साहेब म्हणतील तसंची भाषा.. | पुढारी

अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांची साहेब म्हणतील तसंची भाषा..

बारामती:पुढारी वृत्तसेवा : मी राजकारणात नाही, परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले तर मी जरूर काम करेन. साहेब म्हणतील तसेच होईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युवा नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कुटुंबात एकटे पाडले जात असल्याचे सांगितले होते, यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, मला तसे वाटत नाही. कुटुंब वेगळे व राजकारण वेगळे आहे. पण त्यांना एकटे पाडले, अशी स्थिती नाही.
बारामतीत पवार विरुद्ध पवार निवडणूक लढली जाणार असून त्यात तुम्ही कोणाचे काम करणार अशी विचाऱणा केली असता ते म्हणाले, अजून निवडणूकीला महिना, दीड महिन्याचा अवकाश आहे. यशावकाश सगळ्या बाबी होतील. अगोदर उमेदवार तर ठरू द्या.
ते पुढे म्हणाले, मी बारामतीत विद्या प्रतिष्ठानवर काम करतो. कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे. शरयू अँग्रोच्या माध्यमातून कार्यरत आहेत. खरे तर मी राजकारणात नाही. पण पक्षाच्या नवीन कार्यालयाला भेट द्या अशी विनंती काहींनी केली. त्यामुळे मी इथे भेट दिली.
त्याचा एवढा इश्यू होईल असे मला वाटले नव्हते. पण जर मला राजकारणात यायचे झाले तर मी ग्राऊंड लेव्हलपासून काम करत वर जावू इच्छितो. अर्थात अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही. माझे आई-वडील कायम मला पाठींबा देत आले आहेत. भविष्यात असा निर्णय झाला तरी ते माझ्या पाठीशी असतील. युगेंद्र पवार यांनी माझा प्रचार केला तर आनंदच होईल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, त्यावर युगेंद्र यांनी मलाही त्यांचा प्रचार करून आनंदच होईल, असे उत्तर दिले.  अजित पवार गटाकडून पार्थ व जय हे बारामतीत प्रचारात उतरणार आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, सगळेच भाऊ प्रचार करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.
युगेंद्र पवार यांनी पक्ष कार्य़ालयाला दिलेल्या भेटीबद्दल शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या संबंधी युगेंद्र पवार म्हणाले, पवार साहेबांनी माझ्याबद्दल बोलणे हा माझा सन्मान आहे. शेवटी ते साहेब आहेत. मी त्यांचा खूप सन्मान करतो. त्यांच्याबद्दल कोणी काही बोलू शकत नाही. मी तर खूप छोटा माणूस आहे. त्यांनी माझ्याबद्दल मत व्यक्त केल्याने माझ्यामध्ये उर्जा आली.  लोकसभा निवडणूकीत साहेबांनी सांगितले तर नक्की दौरे करेन असेही ते म्हणाले. पक्ष कार्य़ालयात होणारी गर्दी पाहून पक्ष जोरात वाढेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button