रोबो जाणार बांधावर, करणार शेती; मानवरहित शेतीकडे भारताची वाटचाल | पुढारी

रोबो जाणार बांधावर, करणार शेती; मानवरहित शेतीकडे भारताची वाटचाल

गणेश खळदकर

पुणे : भविष्यात शेतीचे उत्पन्न वाढविणे आणि केवळ रोबोच्या सहाय्याने स्मार्ट पॉलिहाऊसच्या माध्यमातून शेती करण्यासाठी देशात विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. यातूनच पुण्यातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी अ‍ॅग्रोनेट नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातूनच तयार झालेले अ‍ॅग्रोबॉट शेतीवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती महाविद्यालयातील तज्ज्ञांनी दिली आहे.

भविष्यात रोबोच्या सहाय्याने शेती करण्यावर संशोधन केले जात आहे. यातून शेतीचे उत्पन्न वाढणार असून शेती खर्चात मात्र बचत होणार आहे. यासाठी महाविद्यालयाने अ‍ॅग्रोनेट नावाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्या माध्यमातून अ‍ॅग्रोबॉट नावाचा रोबो तयार करण्यात येत आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयडीएस, कॉम्प्युटर सायन्स आदी अभियांत्रिकीच्या शाखांचे प्राध्यापक काम करत आहेत.अ‍ॅग्रोबॉट दर दोन तासाला पिकांची पाहणी करत त्यांचे फोटो काढणार आहे. यामध्ये नेमक्या कोणत्या भागातील पिकांवर कोणता रोग लागला असून तो कोणत्या प्रकारचा आहे, याचे तत्काळ विश्लेषण करण्यात येईल.

त्यावर कोणते औषध फवारणे गरजेचे आहे ते शोधून त्याची पिकांवर फवारणी करणार आहे. यात इंटरनेटच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. त्यासाठी पॉलिहाऊसमध्ये तापमान आणि मातीची स्थिती तपासण्यासाठी सेन्सर लावले जाणार आहेत. यातून पिकासाठी मातीची आर्द्रता किती हे तपासून आवश्यक तेवढे पाणी आणि हवे तसे वातावरण तयार केले जाणार आहे. त्यासाठी सध्या दहा शेतकर्‍यांचासमूह तयार करून त्यांना सरकारी अनुदानातून पॉलिहाऊसची निर्मिती करण्यास सांगण्यात येणार आहे. किमान चार एकरमध्ये पॉलिहाऊस तयार करण्यात येणार असून त्यामध्ये अ‍ॅग्रोनेटची सिस्टीम विकसित केली जाणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे इनोव्हेशन क्लब मेंबर अशोक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांची टीम कार्यरत आहे.

अ‍ॅग्रोमॉन मोबाईल अ‍ॅप विकसित करणार

शेतीवर लक्ष ठेवण्यासाठी अ‍ॅग्रोमॉन मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये पुण्यातून राज्याच्या कोणत्याही कोपर्‍यातील शेतीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. यामध्ये मोबाईलमध्ये प्रोग्रॅमिंग करून अ‍ॅग्रोबॉटच्या माध्यमातून एकाचवेळी पाच पाच पिकांवर लक्ष ठेवता येणार आहे.

महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे विद्यार्थी मिळून एक्सलन्स सेंटरमध्ये संशोधन करत आहेत. अ‍ॅग्रोबॉट उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. यातून भविष्यात शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत.

– डॉ. सुनील ठाकरे, प्राचार्य, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च

हेही वाचा

Back to top button