कार दुभाजकाला धडकली; कोल्हापूरचे तिघे जागीच ठार | पुढारी

कार दुभाजकाला धडकली; कोल्हापूरचे तिघे जागीच ठार

कवठेमहांकाळ /कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरहून देवदर्शन करून घरी परतताना चारचाकी दुभाजकावर आदळून तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर एक गंभीर जखमी झाला. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी पाचच्यादरम्यान हा अपघात झाला. हॉटेल व्यावसायिक सुरेश दगडू जाधव (वय 54, रा. रमण मळा), युवराज विजय जाधव (32, रा. रामानंदनगर) व गौरी विनायक जाधव (35, राजारामपुरी, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत; तर प्रशांत पांडुरंग चिले (40, रा. रामानंदनगर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. मृत हे एकाच भावकीतील आहेत. जखमीवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण येथील उड्डाणपुलावर थरकाप उडविणारा हा अपघात झाला. कवठेमहांकाळ पोलिसांनी सांगितले की, जाधव कुटुंबीय पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून ते कोल्हापूरला चारचाकीतून (एमएच 09 जीएफ 8323) परतत होते. शिरढोणच्या हद्दीत गाडी आली असता चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे गाडी उड्डाणपुलावरील दुभाजकावर आदळली.

डोक्याला गंभीर दुखापत

पंढरपूर दिंडीस जाण्यासाठी 2 आणि 3 तारखेचे बुकिंग करून सर्वजण परतत होते. अपघातानंतर सुरेश, गौरी व युवराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच हात-पायही फॅ्रक्चर झाले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अपघातस्थळाचे द़ृश्य हृदय हेलावून टाकणारे होते.

कुटुंबीयांचा आक्रोश

दरम्यान, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर येथील हॉटेल व्यावसायिकासह तिघांचा मृत्यू झाल्याने रमणमळा, राजारामपुरीसह रामानंदनगर व पाचगाव परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती होताच कुटुंबीय, नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

सुरेश जाधव हे हॉटेल व्यावसायिक शिवाय क्रिकेट खेळाडू होते. शहर परिसरासह त्याचा मित्र परिवार मोठा आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. युवराज जाधव सराफी व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीयासह पाचगावला स्थायिक झाले आहेत.

Back to top button