मुलांमध्ये वाढली वाचनाची गोडी : ’एनबीटी’च्या पुस्तक विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ | पुढारी

मुलांमध्ये वाढली वाचनाची गोडी : ’एनबीटी’च्या पुस्तक विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ

समीर सय्यद

पुणे : कोरोनाच्या काळात पुस्तके वाचण्याचा वेग वाढला. उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय पालक आणि मुले ऑडिओ बुककडे वळली आहेत. कागदाऐवजी टॅबवर वाचन करीत आहेत. तर, एनबीटीच्या बाल पुस्तकांमध्ये 30 टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली. त्यामुळे मुले वाचनाकडे वळताहेत, असे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटनेनुसार 22 भाषांना मान्यता असून, त्यापैकी 17 भाषांचे संपादन हे एनबीटीचे संपादक मंडळ करते, तर उर्वरित भाषेतील पुस्तकांच्या संपादनासाठी त्या भाषेतील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली जाते. एनबीटीमार्फत विविध बोलीसह 55 भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित केली जातात. वाचकांचा कल लक्षात घेऊन एनबीटीने शंभर ऑडियो बुक आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवात विक्रीसाठी ठेवले असून, येणार्‍या काळात अजून विविध विषयांवर ऑडियो बुक तयार केले जातील, असे मराठे यांनी सांगितले.

पुण्यात दहा वर्षांनी पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यात बालसाहित्यावरील पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवातही मोठ्या प्रमाणात बालपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दक्षिणेतील राज्यातील खासगी प्रकाशक व्यवसाय करतात. मात्र, ते गुणवत्तेकडे अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.

एनबीटीपेक्षा प्रकाशकांना पसंती

मराठी भाषेतील नवलेखकांना राज्यातील नावाजलेल्या प्रकाशकांनी पुस्तके प्रकाशित करावीत, अशी अपेक्षा असते. मात्र, ती एनबीटीने प्रकाशित करावीत, अशी इच्छा नसते. त्यामुळे एनबीटीकडे मराठी पुस्तकांचे प्रमाण कमी आहे. एनबीटीने हिंदी भाषेतील पुस्तके अधिक प्रमाणात प्रकाशित केली आहेत. त्यापाठोपाठ इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे.

लेखकांना मिळतो पुस्तक विक्रीवर मोबदला

एनबीटीमार्फत पुस्तक प्रकाशित केल्यानंतर प्रकाशकांना एकाचवेळी मानधन दिले जात नाही. मात्र, पुस्तक विक्रीवर रॉयल्टी वर्षात एकदा दिली जाते. दोन हजार प्रतींची एक आवृत्ती असते. पुस्तकांच्या मागणीनुसार पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली जाते. लेखकाने एनबीटीकडे पुस्तक पाठविल्यानंतर ते प्रकाशित योग्य आहे का नाही, याची तीन तज्ज्ञांमार्फत तपासले जाते. त्यानंतर लेखकाशी संपर्क साधला जातो तसेच ज्या भाषेत पुस्तक आहे, त्या भाषेचे संपादक आणि लेखक एकत्र बसून पुस्तकातील आरोप-प्रत्यारोपाचा उल्लेख आणि आक्षेप घेतली जातील, अशा शब्दांना पर्यायी शब्दांचा वापर केला जातो. त्यानंतरच पुस्तक प्रकाशित केले जाते.

हेही वाचा

Back to top button