तरुणीचे अपहरण करुन, पिस्तुलाचा धाक दाखवत दुष्कृत्य : एक जण अटकेत | पुढारी

तरुणीचे अपहरण करुन, पिस्तुलाचा धाक दाखवत दुष्कृत्य : एक जण अटकेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रस्त्याने जात असताना तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून जबरदस्तीने कारमधून पळवून नेले. तिच्यासोबत लग्न करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर तरुणीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेआठ ते शुक्रवारी (दि. 16) सकाळी साडेआठच्या दरम्यान खराडी येथील झेन्सार चौकातील बसस्टॉप व दस्तुरवाडी गावच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी बलात्कार, आर्म अ‍ॅक्ट,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेंद्र सीताराम वेताळ (रा. भावडी, ता. हवेली) आणि अमोल जाधव (रा. लोणीकंद, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, महेंद्र वेताळ याला शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडून चंदननगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी महेंद्र वेताळ हे दोघे परिचयाचे आहेत, तर अमोल जाधव हा गाडीचा ड्रायव्हर आहे. गुरुवारी सकाळी तरुणी रस्त्याने खराडी येथील झेन्सार चौकातील बसस्टॉप येथे निघाली होती. त्या वेळी अचानक एक चारचाकी तिच्याजवळ येऊन थांबली. आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखविला. तिचे अपहरण करून आरोपी महेंद्र वेताळ याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर नाशिक रोडने दस्तुरवाडी गावच्या हद्दीतील एका डोंगरावर नेऊन तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ करून दुसर्‍या दिवशी तुळापूर फाटा येथे आणून सोडून देऊन आरोपी पळून गेले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.

याप्रकरणी दोघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महेंद्र वेताळ याला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे. वेताळ आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

– संजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त, पुणे शहर

हेही वाचा

Back to top button