पुण्यात भव्य डिफेन्स एक्स्पो : एमएसएमई मंत्रालयाचा पुढाकार | पुढारी

पुण्यात भव्य डिफेन्स एक्स्पो : एमएसएमई मंत्रालयाचा पुढाकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणार्‍या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान पुणे येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे ’महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असणार आहे.

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या उद्देशाने भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे. यात 200 हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि 20 हजारपेक्षा अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञानाची देवाण-घेवाण करतील. या एक्स्पोद्वारे एमएसएमईंना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ’एमएसएमईं डिफेन्स एक्स्पो 2024’ मध्ये एमएसएमईं, संरक्षण अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुमारे दोन हजाराहून अधिक संस्था सहभागी होतील.

डिफेन्स एक्स्पोची ठळक वैशिष्ट्ये

200 हून अधिक स्टॉलमध्ये एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स आदी संरक्षण उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचे प्रदर्शन करतील. बी टू बी मीटिंगमध्ये एमएसएमई आणि प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील मोठ्या संस्था आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रे होतील.

नॉलेज सेमिनार : प्रख्यात तज्ज्ञ आणि या क्षेत्राशी संबंधित प्रमुख व्यक्ती ’संरक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह, संधी आणि आव्हाने’ यावर दृष्टिक्षेप टाकतील.
आर्थिक सहाय्य : संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी उपलब्ध होतील.

हेही वाचा

Back to top button