शिक्षक देता का शिक्षक! बिबवेवाडी शाळेतील पालकांचा आक्रोश | पुढारी

शिक्षक देता का शिक्षक! बिबवेवाडी शाळेतील पालकांचा आक्रोश

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडीतील महापालिका इमारतीच्या एकाच आवारामध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालय, सीताराम आबाजी बिबवे विद्यालय व हैबतराव शिळीमकर विद्यालय या तीन शाळा महापालिकेच्या माध्यमातून चालत आहेत. यापैकी इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी शिक्षकांची वाणवा आहे. नववी-दहावी इंग्रजी माध्यमाच्या वर्गांसाठी महापालिकेने श्री विद्यापन शिक्षण प्रसारक मंडळ या सामाजिक संस्थेकडे अध्यापनाची जबाबदारी दिली आहे. या संस्थेकडून शिक्षकाची नेमणूक करून वर्षभराचा अभ्यास नियमानुसार घेणे गरजेचे आहे. महापालिका व संस्था यांच्यामध्ये करारही झालेला आहे. पण दहावीची परीक्षा पंधरा दिवसांवर आली असताना अनेक विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही.

त्यामुळे पालक व विद्यार्थी चिंतेत आहेत. विद्यालयास माजी आमदार मोहन जोशी, रवींद्र ननावरे, बंडू नलावडे, रामविलास महेश्वरी, जयकुमार ठोंबरे पाटील, उमेश वाखारे व अनेक पालकांनी भेट दिली.

पालकांच्या तक्रारीनुसार माजी आमदार व कार्यकर्त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या दहावीच्या वर्गाची माहिती घेण्याकरिता शाळेला भेट दिली. विद्यालयात प्रशिक्षित शिक्षक नाहीत. निवृत्त शिक्षक व उच्च शिक्षण घेतलेले नागरिक येथे शिकवून जातात. या शाळेत अनेक चुका व त्रुटी आहेत. महापालिकेने ही शाळा स्वतः चालवण्यास घ्यावी.
                                      – शैलेंद्र ऊर्फ बंडू नलावडे, माजी नगरसेवक.

शाळेत भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अनेक बाबींची कमतरता आहे असे दिसून आले. परंतु परीक्षांचा कालावधी असल्यामुळे प्रशासन संस्थेवर किंवा कर्मचार्‍यांवर कारवाई करणार नाही.
                               – आशा उबाळे, शिक्षण अधिकारी, महापालिका.

Back to top button