डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या करून अंनिस कार्यकर्त्यांमध्ये दहशत | पुढारी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या करून अंनिस कार्यकर्त्यांमध्ये दहशत

सीबीआयच्या अंतिम युक्तिवादाला सुरुवात
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा पारित करून समाजातून अंधश्रद्धेच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यरत होते. खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी हल्लेखोर आरोपींना न्यायालयात ओळखले आहे. पिस्तुलातून गोळ्या झाडत दाभोलकरांची हत्या करत अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे आरोपींवर शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा सिद्ध होतो, अशी माहिती सीबीआयच्या वतीने मंगळवारी (दि. 13) विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात देण्यात आली.

सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी अंतिम युक्तिवाद करताना नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर, अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि कोल्हापूरमधील व्यावसायिक संजय साडविलकर यांच्या साक्षीतून सनातन संस्था आणि आरोपी तावडे यांच्या मनात दाभोलकरांविषयी शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना होती हे सिद्ध होते, तर दाभोलकरांवर गोळ्या झाडणार्‍या आरोपी सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी फोटोसह न्यायालयात ओळखले आहे.

आरोपी अंधुरे याने गुन्हा केल्याचा अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब दिला आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले शस्त्र (पिस्तूल) हस्तगत झाले नसले, तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे सांगितले आहे, तसेच दाभोलकरांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर निघाल्याचे शवविच्छेदन करणारे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे शस्त्र हस्तगत झाले नसले, तरी त्यातून गोळीबार झाल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद करत विशेष सरकारी वकिलांनी हा खटला ‘बियाँड रिझनेबल डाउट’ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या शनिवारी (17 फेब्रुवारी) होणार आहे. सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर बचाव पक्षाच्या अंतिम युक्तिवादाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर या खटल्याचा निकाल अपेक्षित आहे.

हेही वाचा

Back to top button