मराठा आरक्षणप्रश्नी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन | पुढारी

मराठा आरक्षणप्रश्नी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजासाठी उपोषण करणार्‍या मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडत असताना मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी ‘वर्षा’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा पारित करण्यासंदर्भात चर्चाही झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे ठाणे दौर्‍यावर असताना तातडीच्या बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले होते. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मराठा समाजाचे आरक्षण आणि अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. हे अधिवेशन तातडीने बोलावून मराठा
आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला चार दिवस झाले आहेत. त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा संघटित होण्यास सुरुवात झाली आहे. आरक्षणाचा विषय अधिक चिघळू नये म्हणून राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तातडीने जाहीर करून विशेष अधिवेशनात स्वतंत्र आरक्षणाचा कायदा पारित केला जाणार आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि सगेसोयरेला कायदेशीर मान्यता द्या, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र ओबीसींचा विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने स्वतंत्र आरक्षणावर भर दिला आहे.

Back to top button