मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपीला सक्तमजुरी | पुढारी

मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपीला सक्तमजुरी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपीला बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जॉन स्टीफन रहिमत मासी (रा. कोटजोगराज, जि. गुरुदासपूर, राज्य पंजाब) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली ते सुरवड रस्त्यावर 18 आक्टोबर 2021 रोजी घडली. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी सुरवड येथील तिच्या शाळेतून दुपारी दीडच्या सुमारास घरी चालत निघाली होती. या वेळी आरोपी पाठीमागून पळत पीडितेजवळ आला. त्याने तिला ’तुम मेरे साथ चलो,’ असे म्हणत तिच्या उजव्या हाताला धरून ओढत जबरदस्तीने अपहरण करण्यास सुरुवात केली तसेच तो पीडितेचा विनयभंग करू लागला. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेटफळ येथील दोघे दुचाकीवर आले. त्यांनी तिची आरोपीच्या तावडीतून सुटका करून आरोपीस पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आरोपीविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 363, 354, 354 ड, पोक्सो कायदा कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केला.

खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्यासमोर सुरू होती. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सादर पुरावा आणि सरकारी वकील प्रसन्न जोशी यांचा युक्तिवाद मे. कोर्टाने ग्राह्य धरून आरोपी मासी याला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली तसेच 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षास ए. एस. आय. नामदेव नलवडे, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अमोल खैरे, मयूर गायकवाड यांनी मदत केली.

Back to top button