ठेकेदार, अधिकार्‍यांच्या भल्यासाठीच पाणी योजना? | पुढारी

ठेकेदार, अधिकार्‍यांच्या भल्यासाठीच पाणी योजना?

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनच्या प्रत्येक कामासाठी वेगळे पैसे शासनाने दिले. असे असताना एकाच चारीमधून तीन योजनांचे पाइप टाकणारे ठेकेदार गावकर्‍यांच्या डोळ्यांत धूळफेक करीत असताना अधिकारी मात्र पाहूनही न पाहिल्यासारखे करीत आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे जलजीवन मिशनची नळ पाणीपुरवठा योजना ही केवळ अधिकारी आणि ठेकेदारांच्या आर्थिक बळकटीसाठी सुरू आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत असून, तशी विचारणादेखील नागरिकांकडून होत आहे.

जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे दौंड तालुक्यातील काम नागरिकांसाठी महत्त्वाचे नसून अधिकारी आणि ठेकेदाराला खूष करणारे आहे. तालुक्यात एकाच ठेकेदाराला आठ गावांच्या योजनेची कामे दिली जातात, ही बाब उघड झाल्यानंतर तीन गावांच्या पाणीपुरवठ्याची मुख्य वितरिका एकाच चारीतून नेण्याचा अभिनव उपक्रम राजरोसपणे होत असल्याने या कामांची पाहणी अधिकारी वर्ग कसा करतो आहे, हे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.

एकच ठेकेदार आणि आठ गावांच्या योजनांची कामे, एकच चारी आणि त्यात तीन गावांच्या जलवाहिनी टाकण्याच्या होत असलेल्या कामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असून, हा सर्व प्रकार अधिकार्‍यांची कार्यप्रणाली दर्शविणारा आहे. सध्या कोणत्याच गावातील योजना पूर्ण झाली नसून केवळ दापोडी गाव त्याला अपवाद आहे. उर्वरित गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला असून, अद्याप ही कामे मार्गी लागली नाहीत. ठेकेदार गावात फिरकत नाहीत, काहीतरी अडचण सांगून ते गायब झाले आहेत. मात्र, अधिकार्‍यांचे हात बर्‍यापैकी ओले करून त्यांनी कामाचे पैसे काढून घेतले आहेत. सध्या तालुक्यात शिरापूर गावच्या योजनेला सुरुवात झालेली नाही आणि कामे मार्चअखेर पूर्ण करू, अशी माहिती दौंड पंचायत समितीचे शाखा अभियंता दिवेकर यांनी दिली आहे.

दौंड तालुक्यात तब्बल 600 कोटींची कामे
दौंड तालुक्यात जवळपास 500 ते 600 कोटी रुपयांच्या आसपासची कामे सुरू आहेत. यापैकी जिल्हा परिषद 300 कोटी, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून 300 कोटी रुपये मिळणार आहेत. यापैकी ठेकेदार आणि अधिकारी सोडल्यास गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकार्‍यांना देखील या कामांबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे या योजना कुणाच्या कल्याणासाठी केल्या जातात? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

Back to top button