पक्षफुटीमुळे पुरंदरमध्ये खा. सुळे यांची वाट बिकट | पुढारी

पक्षफुटीमुळे पुरंदरमध्ये खा. सुळे यांची वाट बिकट

अमृत भांडवलकर

सासवड : पुरंदर विधानसभा मतदारसंघाने नेहमीच खा. सुप्रिया सुळे यांना साथ दिली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुरंदरमध्ये आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयरथाची वाट बिकट झाली आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाला आणि राजकीय समीकरणेच बदलली. याचा सर्वाधिक प्रभाव पुरंदर विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. पुरंदर तालुक्यातील मतदारांनी सातत्याने पवार कुटुंबाला साथ दिली. मात्र, सध्या अजित पवार हेच महायुतीमध्ये असल्याने चित्र बदलेले आहे. तालुक्यातील अजित पवार यांच्या ताकदीच्या बरोबरीने माजी राज्यमंत्री शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची ताकदही सुळे यांच्याविरोधात असणार आहे, तर माजी आमदार अशोक टेकवडे, जि. प.चे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे हे पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि सध्या भाजपात असलेले नेते तसेच भाजपचे बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे हे आगामी लोकसभेत महायुतीचा जो उमेदवार देतील, त्यांना मोठे मताधिक्य देणाच्या तयारीत आहेत.

सुप्रिया सुळे यांची सर्व भिस्त काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यावर असेल. आ. संजय जगताप यांचे तालुक्यातील सासवड, जेजुरी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या बेलसर-माळशिरस गटावर वर्चस्व आहे. सध्या पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप हे एकत्रित करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस इंडिया आघाडीत असल्याने आमदार संजय जगताप यांनी लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात झोकून दिले आहे. गेल्या वेळी त्यांना विधानसभेला सुळे यांनी भक्कम साथ दिलेली आहे.

पुरंदर तालुक्यावर शिवसेनेचे नेते माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा वरचष्मा आहे. तालुक्याचे पंचायत समितीचे 8 पैकी 6 गण आणि जिल्हा परिषदेच्या 4 गटांपैकी 3 गटांवर सेनेचे प्रभुत्व आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा विचार करावयाचा झालाच, तर पुणे शहराला लागून असलेली 18 गावे या मतदारसंघात जोडलेली आहेत. या गावातून भाजप-शिवसेनेचा मतदारवर्ग मोठा आहे. या 18 गावांवरच पुरंदरच्या विधानसभेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने गेल्या दोन निवडणुकांतून दिसून आला आहे. विजय शिवतारे यांचा मतदारसंघ असल्याने सुप्रिया सुळे यांच्यापुढे येथे मोठे आव्हान असणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये माजी आमदार अशोक टेकवडे हे सुप्रिया सुळे यांच्याबरोबर होते. परंतु, टेकवडे आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत. पुरंदर राष्ट्रवादीची गळती ही कुणाच्या पथ्यावर पडणार? भाजपच्या मिशन बारामतीमध्ये पुरंदरमधील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपचे कमळ हातात घेतल्याने पुरंदरची राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. भाजपमध्ये गेलेल्या या नेत्यांची अजित पवार यांच्याशीच पक्षात असताना जवळीक होती. त्यामुळे ते अजित पवार यांनाच निवडणुकीत अनुकूल राहणार आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार गटाबरोबर
पुरंदरमध्ये 2019 च्या लोकसभेत सुप्रिया सुळे यांना 10 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तालुक्यात शरद पवारांचे निष्ठावंत माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, विजय कोलते, सुदाम इंगळे, बबूसाहेब माहुरकर, दिलीप बारभाई, पुष्कराज जाधव, बाळासाहेब भिंताडे आदी शरद पवारांसोबत आहेत.

अजित पवार गट अ‍ॅक्टिव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यंत्रणा तालुक्यात कामाला लागली आहे. यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, वामन जगताप, बाळासाहेब कामथे, सभापती शरद जगताप, अमित झेंडे यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. गेल्या निवडणुकीत पुरंदर मतदारसंघातून 10 हजार मतांची आघाडी सुळे यांनी मिळविली होती. त्यांच्या विजयात पुरंदर-हवेली मतदारसंघाने मोठा हातभार लावला आहे. पुरंदरमध्ये महायुतीपेक्षा इंडिया आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) यांची ताकद फुटीमुळे कमकुवत झाल्याने या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयरथाची वाट बिकट झाली आहे.

Back to top button