वीजमीटरचे रीडिंग घेणार्‍या एजन्सीचा भोंगळ कारभार | पुढारी

वीजमीटरचे रीडिंग घेणार्‍या एजन्सीचा भोंगळ कारभार

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्यात महावितरण कंपनीच्या वीजमीटरचे रीडिंग घेणार्‍या एजन्सीकडून वेळेत रीडिंग घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना जास्तीची अंदाजे वीजबिले दिली जात असून, त्याचा ग्राहकांना मनस्ताप होत आहे. वीजमीटरचे रीडिंग अचूक आणि वेळेत न घेतल्यास आंबेगाव भाजपच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप पक्षाचे उत्तर पुणे जिल्ह्याचे सचिव प्रमोद बाणखेले यांनी दिला आहे. मंचर येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. भाजप तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले, शहराध्यक्ष योगेश बोर्‍हाडे, रोशन हुले, महेश पिंगळे आदी उपस्थित होते. वाढीव वीजबिलांचा ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. सदर बिल रांगेत उभे राहून दुरुस्त करून घ्यावे लागत आहे. एजन्सीकडे वीजमीटरचा तुटवडा असून, 6-6 महिने मीटर बसविले जात नाहीत. ग्राहकांना होणार्‍या या त्रासाबद्दल अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

तरी संबंधित अधिकार्‍यांना सूचना करावी व रीडिंग एजन्सीवर कडक कारवाई करण्यात यावी. या विषयांमध्ये अनेकवेळा समक्ष भेटून व सूचना देऊन देखील वीज अधिकार्‍यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. आपण स्वतः लक्ष घालून रीडिंग एजन्सीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्यात महावितरण कंपनीच्या वीजमीटरचे रीडिंग घेणार्‍या एजन्सीला वेळेत रीडिंग घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. ग्राहकांचे समाधान होईल असे कामकाज केले जाईल.
              – शांताराम बांगर, कार्यकारी अभियंता, वीज महावितरण, मंचर

Back to top button