Crime News : दोघे दुचाकी चोरटे गजाआड | पुढारी

Crime News : दोघे दुचाकी चोरटे गजाआड

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला चोरीस गेलेल्या 13 मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले असून, याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बाबासाहेब नारायण राऊत (वय 27, रा. शेज- बाभुळगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि गणेश भारत हेरकळे (वय 27, रा. अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलिस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांनी केल्या होत्या. त्यानुसार इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हे शोध पथकास दिली होती.

त्यावरून हे पथक माहिती घेत असताना इंदापूर बसस्थानकात एक जण गाडी चोरून घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार प्रकाश माने यांना मिळाली. त्यांनी अशिफ जमादार यांच्या मदतीने मोटारसायकल चोर बाबासाहेब राऊत यास ताब्यात घेतले. पकडलेला राऊत सराईत मोटारसायकल चोर असल्याची खात्री झाल्यावर पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तपासाबाबत गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक विवेक राळेभात यांना सूचना दिल्या. गुन्हे शोध पथकाने तपास करून आरोपीचा साथीदार गणेश हेरकळे यास ताब्यात घेतले. या दोघांकडून आतापर्यंत एकूण 13 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांनी इंदापूर, टेंभुर्णी, अकलूज, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर शहर आदी ठिकाणांहून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकला चोरल्याचे कबूल केले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विवेक राळेभात, सहायक फौजदार प्रकाश माने, विनोद रासकर, तांबे, सलमान खान, नीलेश केमदाने, नंदू जाधव, विशाल चौधर, गणेश डेरे, लखन झगडे यांनी केली आहे.

Back to top button