पासवर्ड बदला अन्यथा खाते होईल रिकामे : संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर | पुढारी

पासवर्ड बदला अन्यथा खाते होईल रिकामे : संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पासवर्ड हे आपल्या डिजिटल अस्तित्वाच्या ओळख तपासणीसाठी अतिशय महत्त्वाचे. अनेक वापरकर्ते तो आळसाने वर्षानुवर्षे बदलतच नाहीत. आपल्या नावातील आद्याक्षरे व पुढे 123 असेच पासवर्ड बहुतेक लोक वापरतात. अजून एक मोठी चूक म्हणजे सर्व विविध ठिकाणी एकच सोपा पासवर्ड असतो. यातूनच हॅकर्सचे काम सोपे होते. त्यामुळे वेळोवेळी पासवर्ड बदलत रहा. अन्यथा तुमचे बँकेचे खाते देखील रिकामे होण्यास वेळ लागणार नाही, असे मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.

आज (दि. 6) सुरक्षित इंटरनेट दिन आहे. सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी हा दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी डॉ. शिकारपूर यांनी दैनिक पुढारीशी संवाद साधत संगणक सुरक्षा, बदलते तंत्रज्ञान, संगणक/ स्मार्टफोनच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. डॉ. शिकारपूर म्हणाले, आगामी काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता , विश्लेषण , यंत्रमानव (रोबोटिक्स) , इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या तंत्रज्ञानामुळे जगाच्या भल्यासाठी अनेक क्रांतिकारी शोध व नवीन उत्पादने बनू शकतील. परंतु हेच सर्व तांत्रिक प्रवाह एखाद्या विकृत, गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडले तर नाशही होऊ शकतो.

यामुळे एमआयटी , स्टॅनफर्ड , हार्वर्ड सारख्या प्रथितयश विद्यापीठात नैतिकता , नीतिमूल्य या मूलभूत विषयावर संगणक तंत्रज्ञांनाचा व उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थांना सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. त्यामुळे काय बरोबर आहे व काय चूक आहे या विचार सरणीवर परिणाम होईल असा त्यांचा होरा आहे. हा प्रवाह काही वर्षातच भारतीय शिक्षणपद्धती मध्येही अंतर्भूत होईल. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा ह्याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे.

सजग राहा…अपडेट व्हा!

  •   सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन सुरक्षित कसे राहायचे याबद्दल स्वतःला शिक्षित करा.
  • मजबूत पासवर्ड वापरा आणि ते नियमितपणे बदला.
  •  तुमचे सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा.
  •  तुमच्या डिव्हाइसवर फायरवॉल आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
  •  सार्वजनिक वाय-फाय वापरताना सावधगिरी बाळगा.
  •  तुमची वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करण्याबाबत सावधगिरी बाळगा.
  •  फिशिंग घोटाळ्यांपासून सावध रहा.
  •  बालकांना सायबर सुरक्षेबद्दल शिकवा.

सायबर प्रशिक्षणात काय हवे?

1. स्मार्टफोन वापराची माहिती
2. सोशल मीडिया माहिती पोस्ट करणे
3. मर्यादित सेल्फी
4. योग्य चलत चित्रण
5. सायबर गुन्हेगारी
6. स्वतःला सायबर सुरक्षित कसे ठेवावे

Back to top button