अवैध धंदे बंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरू : भाजप किसान मोर्चाचा इशारा | पुढारी

अवैध धंदे बंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरू : भाजप किसान मोर्चाचा इशारा

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याने युवा पिढी वाम मार्गावर चालली आहे. हे अवैध धंदे प्रशासनाने तातडीने बंद करावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी दिला. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे बोलत होते. या वेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, माजी उपसरपंच सागर सायकर, सणसवाडीचे माजी उपसरपंच सागर दरेकर, पिंपळे जगतापचे माजी सरपंच शिवाजी जगताप, माजी उपसरपंच सागर शितोळे, अंकुश घारे आदी उपस्थित होते.  या वेळी शिंदे म्हणाले, तरुणाई वाचवण्यासाठी आणि तरुणाईला योग्य दिशेला आणण्यासाठी आपला अवैध व्यवसायांना नेहमीच विरोध असणार आहे. हे धंदे सुरू राहिल्यास आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.

अवैध धंद्याबाबत शिक्रापूर ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला असून सध्या जयेश शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत असून त्यांच्यासोबत असल्याचे शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले. पोलिस ठाणे हद्दीमध्ये कोठेही कोणत्याही स्वरूपाचा अवैध व्यवसाय चालू देणार नाही. तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

– दीपरतन गायकवाड, पोलिस निरीक्षक, शिक्रापूर.

चोरट्यांचा शोध घ्या

शिरूर तालुक्यात वर्षभरात तब्बल 200 हून अधिक विद्युत रोहित्र चोरीला गेलेले आहेत. अद्याप त्याचा शोध पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे अवैध व्यवसायांबरोबरच पोलिसांनी या बाबीकडेही लक्ष देऊन चोरट्यांचा शोध घेणे आवश्यक आहे, असे मत जयेश शिंदे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

Back to top button