जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा उत्साहात | पुढारी

जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा उत्साहात

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरी (ता. पुरंदर) गडावर भंडार-खोबर्‍याच्या उधळणीत ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात पौष पौर्णिमा यात्रा उत्साहात साजरी झाली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी बुधवार (दि. 24) व गुरुवार (दि. 25) या दोन दिवशी देवदर्शन करीत पौष पौर्णिमेची वारी पूर्ण केली. दुष्काळाच्या सावटामुळे यंदा भाविकांची गर्दी खूप कमी होती. मराठा आरक्षण आंदोलनाचाही या वेळी गर्दीवर परिणाम दिसून आला. वर्षभरात जेजुरीत वेगवेगळ्या सात ते आठ यात्रा होत असतात.

सोमवती अमावास्येव्यतिरिक्त प्रत्येक यात्रेत वेगळी परंपरा असते. अशीच ही पौष पौर्णिमा यात्रा होय. पौष पौर्णिमा यात्रा खर्‍या अर्थाने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील बांधवांची यात्रा मानली जाते. राज्यभरातून विविध ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार (पाथरवट), कोल्हाटी आदी आठरापगड जाती-जमातींचे बांधव येथे आले होते. गडकोटात भाविक दर्शनरांगेतून देवदर्शन घेत होते. देवदर्शनाबरोबरच ठिकठिकाणी जागरण गोंधळ, तळीभंडार आदी कुलधर्म-कुलाचार करून आपली वर्षाची वारी उरकत होते. यात्रेनिमित्त जेजुरीतील भरणारा गाढवांचा बाजारही यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य मानले जाते. दोन दिवसांच्या बाजारात चांगलीच आर्थिक उलाढाल झाली. मार्तंड देवसंस्थान, जेजुरी नगरपालिका यांनी भाविकांना सोयीसुविधा पुरविल्या होत्या. जेजुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा :

Back to top button