मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते आम्ही मिळवून देणारच. टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून त्याला थोडा वेळ लागतोय, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे बोलताना केले. पिंपळवंडी येथील यशवंत पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, ‘विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाला माझा विरोध आहे, अशा प्रकारचा अपप्रचार केला जातोय. परंतु, मराठा समाजाला आरक्षण महायुतीचे सरकार मिळवून देणारच, असा शब्द या वेळी अजित पवार यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला जगाने पसंती दिली आहे. ते तिसर्‍यांदा पंतप्रधान होणारच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला विकास करायचा आहे, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. आम्ही एखादा निर्णय घेतला तर तो चूक आणि त्यांनी एखादा निर्णय घेतला तर तो बरोबर. त्या वेळी सोनिया गांधींना साथ दिली; मग त्यांचे ते बरोबर, आता आम्ही मोदींसोबत गेलो तर आमची चूक, असे कसे होणार? असे म्हणत अजित पवार म्हणाले की, विकास करायचा असेल तर त्यासाठी सत्ता लागते.

म्हणून आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहोत. जनतेने पुन्हा एकदा संधी दिली, तर केंद्र आणि राज्य मिळून जनतेचा विकास करू, अशी ग्वाही या वेळी त्यांनी दिली. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, अशी लोकांची तक्रार असल्यामुळे बिबट्यांना पकडण्याबाबत पिंजरे उपलब्ध करून देऊ. कांदा निर्यातीबाबत अमित शहा यांच्याशी बोलून तोडगा काढू, असे पवार यांनी सांगितले. यशवंत पतसंस्थेच्या कारभारावर त्यांनी समाधान व्यक्त केले व या संस्थेचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन केले.

बेनकेंचे ठरले
आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यापुढे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अधिक भक्कम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button