शरद मोहोळ खून प्रकरण : महत्त्वाची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती | पुढारी

शरद मोहोळ खून प्रकरण : महत्त्वाची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद मोहोळ खून प्रकरणात एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती आली असून, ती क्लिप गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, अमित ऊर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, धनंजय वटकर, सतीश शेडगे, नितीन खैरे, आदित्य गोळे, संतोष कुरपे यांची पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित कानगुडे, शेळके, गव्हाणकर, गांदले यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली; तर वटकर, शेडगे, खैरे, गोळे आणि कुरपे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

या वेळी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, गुन्ह्याच्या तपासात ऑडिओ क्लिप मिळाली असून, त्यातून महत्त्वाचा पुरावा हाती लागलेला आहे. तसेच विठ्ठल शेलार आणि फरार आरोपी गणेश मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली. त्या बैठकीला कोण कोण हजर होते? त्याबाबत तपास करायचे आहे. दरम्यान, वटकर आणि शेडगे यांनी मध्य प्रदेशमधील प्रीतसिंग यांच्याकडून शस्त्र खरेदी केले होते, त्याचा शोध घेत आहोत. त्याला आरोपी सहकार्य करीत नाहीत. आरोपींना त्याचा ठावठिकाणा माहिती आहे. मध्य प्रदेशात एक पथक त्यांचा शोध घेत आहे. बेकायदा शस्त्रपुरवठा करण्यात येत असल्याचे पोलिसांची माहिती असल्याचेही तपास अधिकार्‍यांनी सांगितले. या वेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध केला होता.

हेही वाचा

Back to top button