राजू शेट्टी यांच्याशी भाजपच्या मध्यस्थांचा संपर्क

राजू शेट्टी यांच्याशी भाजपच्या मध्यस्थांचा संपर्क

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांशी समान अंतर ठेवून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून संपर्क साधला आहे. भाजपकडून याला दुजोरा मिळाला नाही, तर शेट्टी यांनी आपण स्वतंत्रपणे आखाड्यात उतरणार असल्याचे दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

शेट्टी यांना भाजपच्या वरिष्ठ वर्तुळाकडून संपर्क साधल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती. त्याला दुजोरा म्हणून शेतकरी प्रश्नांची जाणीव ही शेट्टींसाठी भाजपमध्ये जमेची बाजू मानली जात असल्याचा दावा केला जात होता. असे असले तरी शेट्टीच गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांशी अप्रत्यक्षपणे संपर्क साधत असल्याचे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. भाजप एका-एका जागेचा स्वतंत्रपणे विचार करत असून, जिंकण्याची खात्री हाच उमेदवारीसाठी महत्त्वाचा निकष आहे. उद्या शेट्टी यांना भाजपने उमेदवारी द्यायचे ठरवलेच तर त्यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल, अशीही चर्चा आहे. दरम्यान, वाशिम दौर्‍यावर असलेल्या शेट्टी यांनी आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. महायुती आणि महाविकास आघाडी आपल्यासाठी समान अंतरावर असल्याचे त्यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news