मामाच्या रडण्याने सुडाचा पेट; अपमान अन् सरपंचपदामुळे शरद मोहोळचा खून | पुढारी

मामाच्या रडण्याने सुडाचा पेट; अपमान अन् सरपंचपदामुळे शरद मोहोळचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुंड शरद मोहोळ याचा खून दहा वर्षांपूर्वी झालेल्या वादातून तसेच वेगरे गावच्या सरपंचपदावरून झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. याच संघर्षातून शरद मोहोळला मारण्याचा कट शिजल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दि. 5 जानेवारी रोजी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून शरद मोहोळचा त्याच्या राहत्या घराजवळ खून केला होता.  पुण्यातून लवासा सिटीकडे जाताना मुठा गावात शरद मोहोळचे घर, तर वेगरे हे गाव नामदेव कानगुडेचे.
तसेच  मुठा गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेले उरवडे गाव आहे या खुनातील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलारचे.  2010 मध्ये शरद मोहोळ आणि नामदेव कानगुडे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर तो मिटला देखील होता. पुढे दोघे एकत्र काम करायला लागले होते. मात्र, गेल्या वर्षी  गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामदेव कानगुडेची भावजय निवडणुकीला उभी राहिली होती. त्यासाठी  कानगुडेने शरदकडे मदत मागितली. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे दोघांत परत वाद झाला.

विठ्ठल शेलारने संधी हेरली..

शरद मोहोळच्या टोळीतील अंतर्गत वाद विरोधक असलेल्या विठ्ठल शेलार याला समजला. 2017 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या विठ्ठल शेलारची टोळी हिंजवडी आयटी पार्कच्या परिसरात सक्रिय होती. 2021 ला तुरुंगातून सुटून आल्यानंतर शरदने शेलारच्या परिसरात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यातून झालेल्या वादातून शेलारच्या गाडीवर शरद मोहोळच्या साथीदारांनी हायवेला असलेल्या म्हाळुंगे येथील राधा  हॉटेलजवळ 2022 मध्ये हल्ला केला.  विठ्ठल शेलारला त्या वेळी जीव वाचवून पळ काढावा लागला.
शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि विठ्ठल शेलार तर आधीपासूनच भाजपमध्ये होता. मात्र, एकाच पक्षात असलेल्या या दोघांच्या टोळ्यांमधील संघर्ष वाढत चालला होता.  त्यातूनच विठ्ठल शेलारने नामदेव कानगुडेला शरद मोहोळची हत्या करण्याचा कट रचण्यात मदत केली तर अवघ्या वीस वर्षांच्या साहिल पोळेकरने शरद मोहोळवर गोळ्या झाडून मामाच्या अपमानाचा बदला घेतला. त्यासाठी पोळेकरने अनेक दिवस शरद मोहोळच्या पुढे-मागे करून त्याचा विश्वास संपादन केला.
हेही वाचा

Back to top button