काळजी घेतली तरीही….पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही त्याचा बहाणा | पुढारी

काळजी घेतली तरीही....पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही त्याचा बहाणा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी त्याने सर्व काळजी घेतली होती. आजी वारल्याचे सांगून तो गावी गेल्याची थाप ही मारली. मात्र, तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरी झाल्याच्या दिवशी तो त्याच ठिकाणी असल्याचे दिसून आले अन् त्याचे बिंग फुटले. सराफाच्या दुकानातील पाच किलो सोने आणि अकरा लाखांची रोकड चोरणार्‍याला साथीदारांसह फरासखाना पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकांनी अटक केली. त्यांनी चोरलेला मुद्देमाल विहीर, शेतात आणि गवतात लपवून ठेवला होता. तो शोधण्यासाठी बीडीडीएस, श्वान आणि डी.एस.एम.डी पथकांचा वापर करण्यात आला. मेटल डिटेक्टरच्या मदतीने लपवलेले सोने भेटले. मुख्य आरोपीला मदत केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनाही अटक केले आहे.

संबंधित बातम्या :

याबाबत पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल म्हणाले, फिर्यादी दीपक माने यांचे राज कास्टींग नावाचे दुकान आहे. त्यांना 1 जानेवारी रोजी दुकानात चोरी झाल्याचे दिसले. दुकानाची व तिजोरीची चावी वापरून चोरी झाल्याचा त्यांनी अंदाज वर्तवला. त्यानुसार सध्या कामाला असलेले आणि काम सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान, दुकानात काम करणारा मुख्य आरोपी सुनील कोकरे हा आजी वारल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी गावाला जातो, असे सांगून गेला होता. मात्र, तांत्रिक विश्लेषणात तो पुण्यातच असल्याचे समजले. तर त्याचा मित्र अनिल गारळे हा मात्र पुणे सोडून गेल्याचे आढळले.

यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. त्यानुसार मुख्य आरोपी सुनील कोकरे आणि त्याचा एक साथीदार तानाजी खांडेकर यांना सांगलीतील जतमधून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अनिल गारळे याला कोल्हापूरमधून ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सुनील गोगरे याने शेतात आणि हत्ती घासमध्ये रोकड व सोने लपवल्याचे सांगितले. कोकरेची आई राजश्री कोकरे, भाऊ अनिल कोकरे, नवनाथ कोकरे यांनाही अटक करण्यात आली.

चोरी करून चावी पुन्हा बॅगमध्ये ठेवली
दुकानाच्या मालकाचा मावस भाऊ संबंधित दुकानाचे व्यवस्थापन पाहत होता. त्याच्या खोलीतच मुख्य आरोपी सुनील कोकरे आणि अनिल गारळे राहायला होते. अनिल गारळेने मालकाच्या मावस भावाच्या बॅगेतून दुकानाची चावी चोरून सुनील कोकरेला दिली. सुनीलने रात्री चोरी केल्यानंतर चावी परत अनिलला दिली. त्याने ती गुपचुप पुन्हा बँगेत ठेऊन दिली.

Back to top button